आज ‘महाकवी कालिदास दिन.’ कालिदासाची जन्मतिथी उपलब्ध नाही, पण मेघदूतातल्या ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या शब्दयोजनेमुळे कालिदास या तिथीशी एवढा जोडला गेला की, ‘आषाढ प्रतिपदा’ हा दिवस ‘कालिदास दिन’ म्हणून साजरा केला जातो. संस्कृत साहित्यातील कालिदास हा असा एकमेव साहित्यकार आहे की, ज्याच्या काव्यातील एका उल्लेखामुळे तो दिवस त्याच्या नावाने ओळखला जातो. केवळ संस्कृत वाङ्मयातच नव्हे, तर संपूर्ण जागतिक वाङ्मयांत कविकुलगुरू कालिदासाचे स्थान अद्वितीय आहे.
आषाढ प्रतिपदेला कालिदास दिन का साजरा करतात ?
महाकवी कालिदासाने ‘मेघदूत’ नावाचे खंडकाव्य लिहिले. या काव्यातील दुसरा श्लोक ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हे सूचित करतो.
तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्त: स कामी,
नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठ: ।
आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं,
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।
या श्लोकात यक्षाचं वर्णन केलेलं आहे. या यक्षाला आषाढाच्या पहिल्या दिवशी रामगिरीच्या टेकडीवर बाष्पयुक्त ढग दिसला. या ढगाला आपला दूत समजून यक्ष प्रिय पत्नीला द्यायचा निरोप सांगतो. हा निरोप आणि निरोपाच्या अनुषंगाने येणारे काव्य म्हणजे मेघदूत होय. या श्लोकात येणाऱ्या उल्लेखामुळे आषाढ प्रतिपदा कालिदास दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
कविश्रेष्ठ कालिदास कोण होता ?
भारतीय परंपरा आणि पाश्चात्त्य अभ्यासक या दोघांनीही सर्वश्रेष्ठ संस्कृत कवी म्हणून कालिदासाचा गौरव केला. त्याचा काळ कोणताही असो, त्याने काळमार्गावर उमटवलेली मुद्रा इतकी ठळक आहे की, दीड हजार वर्षे उलटून गेली तरी त्याचे स्थान अढळ आहे. ’पुरा कवीनां गणनाप्रसंगे कानिष्ठिकाधिष्ठित कालिदास:’ अर्थात – पूर्वी कवींची गणना करताना कानिष्ठिकेवर म्हणजे करंगळीवर कालिदासाचे नाव घेतले गेले. तत्तुल्यकवेराभावात – अजूनही त्या तोडीच्या दुसर्या कवीचे नाव आढळले नाही, म्हणून ‘अनामिका सार्थवती बभूव’ अनामिका हे बोटाचे नाव सार्थ झाले. म्हणूनच, या श्लोकात कालिदासाची सर्व महती आहे, असे वाटते.
हेही वाचा : ‘फादर्स डे’ वेगवेगळ्या दिवशी का साजरा करतात ? ‘फादर्स डे’च्या विविध परंपरा…
कालिदासाचे साहित्यविशेष
कालिदासाने स्वत:ची काहीच माहिती काव्यामध्ये दिली नाही. त्यामुळे त्याच्याविषयीच्या ज्या दंतकथा आहेत, त्यावर विश्वास ठेवावा लागतो. भावकवी, महाकवी व नाटककार या तिन्ही भूमिका वठवण्यात कालिदास कमालीचा यशस्वी झाला. तो केवळ कवी, महाकवी राहिला नाही, तर ’कविकुलगुरू’ बनला. त्याच्या साहित्यकृती सात. ‘ऋतुसंहार’ आणि ‘मेघदूत’ ही खंडकाव्ये, ‘कुमारसंभवम ’, ‘रघुवंश’ ही महाकाव्ये आणि ‘विक्रमोर्वशीयम’, ‘अभिज्ञानशाकुंतलम’ व ‘मालविकाग्निमित्रम’ ही तीन नाटके. संस्कृत साहित्यातील प्रमुख पाच महाकाव्यांपैकी दोन महाकाव्ये एकट्या कालिदासाची आहेत.
कालिदासाची मौलिक प्रतिभा वादातीत आहे. कवी जयदेवाने कालिदासाला ‘कविताकामिनीचा विलास’ म्हटले. बाणभट्टाने कालिदासाच्या काव्याला ’मधुरसाद्रमंजिरी’ची उपमा दिली. सुमारे सोळा शतके उलटून गेली, पण कालिदास तो कालिदासच!
त्याची विद्वत्ता जशी चतुरस्र आहे, तशी त्याची कलानिपुणताही रसिकांचे समाराधन करणारी आहे. विद्वत्ता आणि वैदग्ध यांचा अपूर्व मेळ त्याच्या साहित्यात दिसतो. म्हणूनच त्याचे साहित्य पांडित्याने चमकणारे असले, तरी त्यात विद्वत्तेची जडता नाही. कलेची समृद्धी असून चातुर्याचा देखावा नाही. कालिदासाच्या साहित्यातून वेदान्त, पूर्व मीमांसा, सांख्य, योग इ. दर्शने, व्याकरणादी शास्त्रे याचे वेचक दर्शन आपल्याला होते. ‘शाकुंतल’मधील उल्लेखावरून काव्य, इतिहास, पुराण याचा प्रत्यय येतो. अनेक शास्त्रे व साहित्य यांचे ज्ञान कालिदासाला होते, हे त्याने दिलेल्या सूक्ष्म व मार्मिक दाखल्यांवरून दिसून येते.त्याचे साहित्य हे मनाला गुंतवून टाकणारे, भुरळ घालणारेच…
कालिदासाच्या साहित्यात अनेक भूप्रदेशांचे भौगोलिक आणि ऐतिहासिक उल्लेख आहेत. यक्षाने मेघाला दाखवलेला रामगिरी ते कैलासापर्यंतचा मार्ग, रघूने दिग्विजयाच्या निमित्ताने केलेले भारतभ्रमण बघितले, तर कालिदास केवळ बहुश्रुत होता; एवढेच नाही तर त्याने स्वत: खूप प्रवास करून जीवनाचे सापेक्षतेने अवलोकन केले होते, असे दिसते. कालिदासाच्या सूक्ष्म आणि रसिक अवलोकनाचा प्रत्यय त्याच्या निसर्गवर्णनात येतो. ‘ऋतुसंहार’मध्ये तटस्थ निरीक्षकाच्या भूमिकेतून, तर यक्षाच्या अन् पुरुरव्याच्या भूमिकेत आपुलकीच्या नात्याने कालिदासाने निसर्गाचा परिचय घडवला आहे. ‘मेघदूत’ व ‘शाकुंतल’मध्ये निसर्ग चालता-बोलता दिसतो. कालिदास हा शृंगाराचा अधिपती होता, पण त्याने स्वैराचाराला कधीच प्रतिष्ठा दिली नाही. परंतु, त्याचे वैयक्तिक आयुष्य आणि त्याचे साहित्य याचा विपर्यास झालेला दिसतो. कालिदासाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, त्याची विनोदबुद्धी की, जिचे वावडे बहुतेक विद्वानांना असते. कालिदासाचा विनोद नर्म आहे. हृद्य आहे. शकुंतलेची थट्टा करणारी तिची सखी, रक्षकांचा चावा घेणारा धीवर ही याचीच उदाहरणे आहेत.
मात्र, कालिदासाच्या उदार, समृद्ध आणि रसिक व्यक्तिमत्त्वातील एक उणीवही लक्षात येते. जीवनातील खोली आणि विस्तार त्याने अवलोकीलेला असला तरी, जीवनाची भयानकता त्याला संमत दिसत नाही. निसर्गाचे सौंदर्य त्याने न्याहाळले आहे, पण निसर्गाचे रौद्र रूप त्याने बघितले नाही. जीवनातील शृंगार, त्यातला प्रणय त्याने पाहिला, पण त्यातली अनित्यता त्याच्या नजरेस आली नसावी.
कालिदासाच्या बाह्य जीवनाचे विशेष धागेदोरे हाती लागत नाहीत, पण त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन विशेष त्याच्या साहित्यावरून दिसून येतात. कालिदासाला राजाश्रय होता, त्याच्या उत्कृष्ट काव्यनिर्मितीमुळे हेवा वाटावा असे यश मिळाले असताना, कालिदासाला अभिमानाची बाधा झालेली नाही. त्याच्या विद्वत्तेला अपूर्व विनयाची झालर आहे. नाटकात प्रस्तावनेत तो स्वत:च्या नावापलीकडे काही सांगत नाही. ‘शाकुंतल’, ‘रघुवंश’ या काव्यांच्या प्रस्तावनेमध्ये तो अतिशय लीन भाषा वापरतो. आत्मविश्वास असूनही त्याच्या लेखनात किचकटपणा, अहंकार नाही.
असा हा कविताकामिनीचा विलास कालिदास. संस्कृतसाहित्य म्हटले की, ज्याचे नाव प्रथम आठवते तो कालिदास. त्याच्याशी तुलना होईल असा कोणी सर्वज्ञात कवी संस्कृतमध्ये नसल्याने ‘अनामिका सार्थवती बभूव।’