धवल कुलकर्णी

ठाकरे घराणं हे मूळचं पंत सचिवांच्या भोर संस्थानातील पाली गावचं. ठाकरे कुटुंबाचे एक पूर्वज हे नाशिक जिल्ह्यातल्या धोडप नावाच्या किल्ल्याचे किल्लेदार होते. इंग्रजांशी त्वेषाने लढा देणाऱ्या या किल्लेदार पूर्वजांच्या स्मृतीत ठाकरेंनी धोडपकर असे एक जादा आडनाव सुद्धा लावले.

आपल्या आत्मचरित्रात म्हणजे ‘माझी जीवन गाथा’मध्ये प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे असे लिहितात की, त्यांचे वडील सिताराम ऊर्फ बाळा हे या जादाच्या धोडपकर आडनावाच्या वाटेला फारसे कधी गेले नाहीत.

प्रबोधनकारांचे पणजोबा कृष्णाजी माधव उर्फ आप्पासाहेब हे पूर्वी पालीला राहत. वाडवडिलार्जित इस्टेटीच्या वादामुळे अप्पासाहेबांनी पाली सोडले. ‘माझी जीवन गाथा’मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पाली गावात आजही काही ठाकरे घराणे असावीत. पण आमचा व या पालकर ठाकर्‍यांचा आडनावापलीकडे फारसा संबंध कधीच आलेला नाही, असेही प्रबोधनकार म्हणतात.

अप्पा पुढे ठाण्याला गेले व त्यांनी इंग्रजांच्या आमदानीत वकिली सुरू केली. एक निस्पृह वकील म्हणून त्यांनी नाव कमावले कंपनी सरकारने त्यांना “खुर्चीचे वकील” केले. म्हणजे तेव्हा फक्त न्यायाधीशच खुर्चीवर बसायचे व बाकीचे खाली जमिनीवर. पण आप्पासाहेबांना न्यायाधीशाच्या बरोबरीने खुर्चीवर बसण्याचा मान होता.

त्यांचे चिरंजीव व प्रबोधनकारांचे आजोबा रामचंद्र उर्फ भिकोबा धोडपकर यांना तात्या असेही म्हणत. तेसुद्धा कोर्टातच नोकरी करायचे. त्यांची बदली ठाण्याहून पनवेलच्या स्मॉल कोर्टात झाली व ते तिथेच पुढे स्थायिक झाले. “धोडपकरांचे आम्ही पनवेलकर बनलो. आजोबांनी आमरण जरी धोडपकर आडनाव चालवले, तरी माझ्या वडिलांनी मात्र शाळेत नाव घालतानाच ठाकरे आडनावाची पुनर्घटना केली. ती आजवर चाललेली आहे,” असे प्रबोधनकार नमूद करतात.

अर्थात केशवराव ठाकरे हे प्रबोधनकार झाले याचं कारण म्हणजे त्यांनी 1921 मध्ये सुरू केलेलं प्रबोधन नावाचं पाक्षिक. ते जेमतेम पाच वर्ष जरी चाललेलं असलं तरीसुद्धा या पक्षिकामुळे केशवराव प्रबोधनकार झाले!

पत्रकार व प्रबोधनकारांच्या साहित्याचे अभ्यासक सचिन परब यांनी एक इंटरेस्टिंग गोष्ट नमूद केली. प्रचंड व्यासंगी असलेल्या प्रबोधनकारांनी आपल्या आडनावाचे स्पेलिंग बदलले होते. इंग्रजी लेखक William Makepeace Thackeray यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी आपले आडनाव Thakre वरून Thackeray केले.

Story img Loader