केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांची अखेर केंद्र सरकारने पदावरून गच्छंती केली. पुदुच्चेरी सरकार आणि विशेषत: पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्याशी असलेलं विळ्या-भोपळ्याचं नातं किरण बेदींना भोवल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, यासोबतच, किरण बेदींनी ऐन निवडणुकांच्या आधी पदावरून दूर करून भाजपनं देखील हा मास्टर स्ट्रोक खेळला आहे का? अशी देखील कुजबुज आता राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. कारण २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकांपासून किरण बेदींचं भाजप प्रेम जगजाहीर असताना आणि आक्रमकपणे भाजपच्या धोरणांचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तीला ऐन निवडणुकांच्या आधी भाजपनं कसं हटवलं? असा सवाल आता केला जात आहे.

पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस-डीएमके सरकारचे प्रमुख व्ही. नारायमसामी यांनी आपल्या कार्यकाळात किरण बेदी यांच्यावर अनेकदा हेकेखोरपणा आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या समर्थनार्थ वागण्याचे आरोप केले आहेत. गेल्याच महिन्यात खुद्द मुख्यमंत्रीच किरण बेदींच्या विरोधात त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसले होते. त्यामुळे त्यांच्यातला हा वाद जगजाहीर होता. या पार्श्वभूमीवर येत्या मे महिन्यात पुदुच्चेरीमध्ये निवडणुका होणार असल्यामुळे नारायणसामींनी आपला विरोध अधिकच तीव्र केल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर केंद्रीय भाजप सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

मंगळवारी रात्री केंद्र सरकारने किरण बेदी यांना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल पदावरून हटवल्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर किरण बेदींनी ट्वीटरवर पोस्ट टाकून सर्वांचे आभार मानले. तसेच, जे काही केलं, ते सगळं व्यापक जनहितासाठीच केल्याचा देखील आपल्या पत्रात उल्लेख केला. तसेच, स्वत:च्या निर्णयांविषयी उल्लेख न करता ‘टीम राज निवास’ने घेतलेले निर्णय असा उल्लेख बेदींच्या पत्रात आढळतो.

 


पुदुच्चेरी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे २ मंत्री आणि २ आमदारांनी आत्तापर्यंत राजीनामे दिले आहेत. एका काँग्रेस आमदाराला पक्षविरोधी कारवायांसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे पुदुच्चेरी विधानसभेतलं संख्याबळ सत्ताधारी आणि विरोधक असं समसमान म्हणजेच प्रत्येकी १४ आमदार झालं आहे. दोन महिन्यांवर निवडणुका आल्या असताना काँग्रेसप्रणीत आघाडी सरकार अल्पमतात येणं आणि त्याचवेळी किरण बेदींची गच्छंती होणं, यावर वेगवेगळे राजकीय तर्क बांधले जात आहेत.

किरण बेदींच्या कारभाराविरोधात राज्य सरकारनं गेल्या ६ महिन्यांत मोठं रान उठवलं होतं. त्यामुळे राज्यपाल आणि पर्यायाने भाजपविरोधी वातावरण निर्मिती झाल्याचं चित्र उभं राहिलं होतं. या पार्श्वभूमीवर निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून किरण बेदींच्या आडून भाजपला लक्ष्य केलं जाण्याची मोठी शक्यता होती. त्यामुळेच, भाजपने किरण बेदींना हटवून काँग्रेसच्या आक्रमणातली हवा आधीच खेळल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यासोबतच, व्यापक जनहिताला प्राधान्य देत असल्याची छबी देखील भाजपला निर्माण करता आल्यामुळेच निवडणुकांसाठीच हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

या पार्श्वभूमीवर पुदुच्चेरीमध्ये आगामी निवडणुकांमध्ये भाजपकडून जोरदार प्रचार करून काँग्रेसला धूळ चारण्याचे आडाखे आखले जाऊ शकतात. त्यामुळे विधानसभेत समसमान संख्याबळ झाल्यामुळे आधीच रंजक झालेली पुदुच्चेरीची राजकीय परिस्थिती निवडणुकांमध्ये अधिकच चुरशीची होण्याची शक्यता आहे!

– प्रविण वडनेरे

किरण बेदींना मुख्यमंत्र्यांसोबतचा वाद भोवला?