मला तीन व्यक्तीमत्वांनी नेहमीच भुरळ पाडली. मायकल जॅक्सन, राज ठाकरे आणि युवराज सिंग. या तिघांच वैशिष्टय म्हणजे माणसांना आपल्याकडे खेचून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. लोक त्यांच्या प्रेमात पडतात. आपआपल्या क्षेत्रात अव्वल असलेली ही तिन्ही माणसं जेव्हा जेव्हा त्यांच्या स्टेजवर आली तेव्हा त्यांनी माहोल तयार केला. वातावरण आपल्या ऊर्जेने भारुन टाकलं. जॅक्सनचा डान्स, राज ठाकरेंच भाषण आणि युवराजची फलंदाजी सुरु असताना टीव्हीवर डोळे न खिळलेली माणसं सापडणं दुर्मिळ. युवराज तुझी मायकल जॅक्सन बरोबर केलेली तुलना काही जणांना खटकू शकते. तू मायकल एवढं स्टारडम नाही अनुभवलस. पण माझ्यासाठी तू मायकल जॅक्सनपेक्षा कमी सुद्धा नव्हतास. त्याच्या थ्रिलर अल्बममधील थ्रिलर गाणं ऐकताना आपोआप पाय थिरकायला लागतात. तसचं तुझी शैलीदार डावखुरी फलंदाजी पाहून मनाला एक वेगळा आनंद मिळतो.
आता यापुढे तू मैदानावर खेळताना दिसणार नाहीस. हे कटू सत्य पचवणं माझ्या सारख्या चाहत्यांसाठी खूप कठिण आहे. काल निवृत्तीची घोषणा करताना तू जितका भावूक झाला होतास तितकच आम्हाला सुद्धा वाईट वाटलं. मला क्रिकेट कळायला लागल्यापासून मी भारतातले जे लेफ्टी फलंदाज पाहिले त्यात तू मला जिंकून घेतलसं. तुझ्याआधी रॉबिन सिंग, सौरव गांगुलीला पाहिलं. एकाचं ऑफसाईड बरोबर तर दुसऱ्याचं लेगसाईड बरोबर शत्रुत्व होतं. रॉबिन सिंगची बॅट ऑफसाईडला तलवारीच्या पातीसारख चालल्याच कधी पाहिलं नाही. भारतीय क्रिकेटचा ‘दादा’ म्हणजे सौरव ऑफसाईडला जितक्या जोरात फटके मारायचा. तितकीच लेगसाईड त्याची शत्रू वाटायची. माझ्या दुष्टीने तू भारताला गवसलेला पहिला परिपूर्ण लेफ्टी होतास. कारण ऑफ असो वा लेग साईड तुझ्या बॅटचा सर्वच दिशांना मुक्त संचार असायचा.
युवराज तुला पहिल्यांदा २००० साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये खेळताना पाहिलं. त्यावेळी तुझी फलंदाजी पाहून भारतीय क्रिकेटला उज्वल भविष्य असल्याचा मनात विश्वास निर्माण झाला. कारण त्यावेळी भारतीय संघ संपूर्णपणे सचिन नावाच्या क्रिकेटच्या देवावरच अवलंबून होता. अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये तू ज्या सहजतेने षटकार ठोकत होतास ते पाहून तुला एकेरी-दुहेरी धावा काढता येतात कि, नाही असा प्रश्न मनात निर्माण झाला. त्यानंतर २००० साली आयसीसी ट्रॉफी स्पर्धेतून तू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेस.
केनिया विरुद्ध तुला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातून भारतीय क्रिकेटमध्ये नव्या स्टारचा उदय होत असल्याचे संकेत दिलेस. त्यावेळी सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या तू मैदानावर चिंधडया उडवल्या. ग्लेन मॅग्राथ, ब्रेट ली आणि जेसन गीलेस्पी यांच्या भेदक माऱ्यातील हवा काढून घेतली. त्यावेळी ८० चेंडूत तू ठोकलेल्या ८४ धावा आजही लक्षात आहेत. त्यानंतर युवराज तू कधी मागे वळून पाहिले नाहीस. २००२ साली नॅटवेस्ट सीरीजच्या इंग्लंड विरुद्धच्या अंतिम सामन्यात तू आणि कैफ दोघांमुळेच दादाला टी-शर्ट काढून फ्लिंटॉप बरोबरचा हिशोब चुकता करण्याची संधी मिळाली.
२००७ सालचा टी-२० वर्ल्डकप असो वा २०११ चा वर्ल्डकप. हे दोन्ही विश्वचषक धोनी उंचावू शकला ते फक्त तुझ्यामुळेच. तू काल निवृत्त होताना सर्वांचे आभार मानलेस. तसेच धोनीने सुध्दा त्याच्या निवृत्तीच्यावेळी तुझे आभार मानले पाहिजेत असे मला एक चाहता म्हणून वाटते. तू क्रिकेटच्या पीचवर मॅचविनर होतास पण आयुष्याच्या पीचवर तू लाईफ विनर आहेस. नुसत्या कॅन्सरच्या नावानेच अनेक जण गळून पडतात. तू त्या जीवघेण्या आजारावर मात करुन मैदानात परतलास. ही खूप मोठी गोष्ट आहे. तुझ्या या जीवनप्रवासाकडे बघून आज अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मनात आपण बरे होऊ शकतो हा विश्वास निर्माण झाला आहे.
कर्करोगावर मात करुन तू मैदानावर परतलास तेव्हा माझ्या सारख्या चाहत्यांना पूर्वीसारखा तो युवराज गवसला नाही. हळूहळू भारतीय क्रिकेट संघातील हक्काची तुझी जागा राहिला नव्हती. २०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तो पूर्वीच युवराज दिसला. विराटही तुझी फलंदाजी पाहून अवाक झाला होता. पण हा आनंद क्षणिक ठरला. अखेर आज ना उद्या तू क्रिकेटला अलविदा करणार हे कळून चुकले होते. भारतीय क्रिकेटला तू भरभरुन दिलेस. आमच्यासारख्या क्रिकेटप्रेमींना तुझ्यामुळे असंख्य आनंदाचे क्षण अनुभवता आले. तुझ्यासारख्या जिगरबाज खेळाडूला मैदानावर निवृत्त होताना पाहायला आवडलं असतं. काल निवृत्तीच्यावेळी तू जितका भावून झाला होतास तितकच आम्हाला सुद्धा वाईट वाटलं. वी विल ‘मिस यू युवी’.