भाजपला चिंता; ‘पारदर्शी’ कारभारासाठी मंत्रिमंडळ बैठकही खुली करा-अनिल परब यांचा टोला

मुंबईत स्वबळावर लढून त्यात भाजपची पीछेहाट झाल्यास त्याचा परिणाम उत्तर प्रदेशातील निवडणुकीवरही पडण्याची भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळे शिवसेनेकडून मिळतील तेवढय़ा जागा पदरात पाडून घेऊन युती करावी, असा दबाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे.

दरम्यान, भाजपचा ‘पारदर्शी’ कारभारासाठी आग्रह असल्याने मंत्रिमंडळ बैठकीचे कामकाज खुले करावे आणि विरोधी पक्षनेत्यांनाही आमंत्रित करावे, असा टोला लगावत शिवसेना नेते आमदार अनिल परब यांनी राज्य व केंद्र सरकारच्या कारभारातही पारदर्शीपणा आणावा, असे स्पष्ट केले. भाजपला मुंबईत निम्म्या जागांची अपेक्षा असली तरी शिवसेनेपुढे नमते घेऊन ९५-१०० जागांवर तडजोड करावी, असे भाजपच्या काही नेत्यांना वाटत आहे.

शिवसेनेची सत्ता हिसकावून घेऊन स्वबळावर भाजपचा महापौर निवडून आणणे खूप अवघड असल्याची भाजपला जाणीव आहे. मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल २३ फेब्रुवारीला जाहीर होईल. त्यादरम्यान उत्तर प्रदेशात रणधुमाळी सुरू असेल. जर मुंबईत शिवसेनेची सरशी झाली आणि भाजपला स्वबळावर यश मिळाले नाही, तर प्रसिद्धीमाध्यमांमधून भाजप व मोदी यांना ‘लक्ष्य’ केले जाईल. नोटाबंदीचा मुंबईत फटका बसला, असा विरोधकांकडून मोदींविरोधात प्रचार होईल, अशी भीती काही भाजप नेत्यांना वाटत आहे. जर शिवसेनेशी युती केली, तर महापौरपद मिळाले नाही, तरी सत्तेत सहभाग राहील. त्यामुळे शिवसेनेविरोधात स्वबळावर लढू नये व स्वत:ला पणाला लावू नये, असा दबाव मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आहे.

सर्वत्रच पारदर्शी कारभार हवा

महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी ‘पारदर्शी’ कारभाराची अट घालत भाजपने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याने शिवसेनेनेही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. केवळ एकाच महापालिकेत नाही, तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, मंत्रालय व राज्य सरकारचे सर्व विभाग आणि केंद्र शासनातही पारदर्शी कारभार हवा, असा टोला शिवसेना नेते परब यांनी लगावला आहे. महापालिकेत स्थायी समितीच्या बैठकीचे कामकाज प्रसिद्धीमाध्यमांना खुले असते. त्याप्रमाणे राज्य मंत्रिमंडळ बैठकीचेही करावे, विरोधी पक्षनेत्यांनाही आमंत्रित करावे, अशी सूचना परब यांनी केली. शिवसेना हा लढणारा पक्ष आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

..तर शिवसेना जागा कशा देणार?

  • शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेची दुसरी फेरी बुधवारी पार पडली असून भाजपला निम्म्या जागांची अपेक्षा आहे. पण या जागा नेमक्या कुठल्या हव्या आहेत, याची यादी शिवसेनेने भाजपकडे मागितली आहे. त्यानंतर चर्चेची पुढील फेरी होईल. जागावाटपासाठी महापालिकेच्या २०१२च्या निवडणुकांचा निकष धरायचा की २०१४च्या विधानसभा निवडणुकीतील बलाबल गृहीत धरून जागावाटप करायचे, हा तिढा आहे.
  • विधानसभा निवडणुकीत महापालिकेच्या ११४ प्रभागांमध्ये भाजपला आघाडी आहे. तेथे भाजपची ताकद असल्याने ते आम्हाला द्यावेत, अशी भाजपची मागणी आहे. मात्र या जागांवर शिवसेनेचे ४० नगरसेवक असल्याने त्या भाजपला देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा असून भाजपला किती व कोणत्या जागा हव्यात, त्याची यादी दिल्यावर शिवसेना निर्णय घेणार आहे.