मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करण्यास भाजप सकारात्मक असून आजपासून चर्चेला प्रारंभ केला जाईल अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर माध्यमांशी ते बोलत होते.
आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमातून युतीबाबत भाष्य केले होते. उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत भाजप आजपासून शिवसेनेशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
सध्या कोणी किती जागा लढवायच्या या आकड्याच्या खेळात भाजपला पडायचं नाही. त्याची सार्वजनिक चर्चा करणे ही सध्या योग्य नाही. मुंबईचा कारभार पारदर्शीपणे कसा चालेल यावर चर्चेत भर दिला जाईल. दोन्ही पक्षांच्या समान धोरणावर चर्चा केली जाईल असेही ते म्हणाले. शिवसेनेबरोबर जी चर्चा होईल त्याची सर्व माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना देण्यात येईल. शिवसेनेबरोबर युतीबाबत चर्चा सुरू करण्यापूर्वी वर्षा निवासस्थानी भाजपची बैठक झाली. यात चर्चेची दिशा ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येते. युतीबाबत काही निर्णय झाल्यानंतर माध्यमांना ते कळवण्यात येईल असेही शेलार यांनी सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीपर्यंत भाजप- शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. भाजपकडून खासदार किरिट सोमय्या आणि आशिष शेलार हे सातत्याने मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कारभारावरून टीका व गंभीर आरोप करत होते. मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार असल्याचे ते वारंवार सांगत. त्यामुळे युतीबाबत साशंकता होती. परंतु बुधवारी भाजपने युतीसाठी सध्यातरी एक पाऊल मागे घेतल्याचे चित्र दिसत आहे. बुधवारी दुपारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. त्यात मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिका व २६ जिल्हा परिषद निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
शिवसेनेनेही इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. येते दोन दिवस दोन्ही पक्षासाठी महत्वाचे ठरणार आहेत. गत ३० वर्षांपासून मुंबई महापालिकेत भाजप व शिवसेनेची युती आहे. गत विधानसभा निवडणुकीवेळी दोन्ही पक्षांची युती संपुष्टात आली होती. त्यानंतर राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी सोयीची भूमिका घेत युती करण्याचे धोरण स्वीकारले होते.