माजी हॉकीपटू धनंजय महाडिक यांना फसविणाऱ्या बिल्डरला उमेदवारी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पारदर्शक कारभाराचा’नारा देत मुंबई महानगरपालिकेचे रणशिंग फुंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा ‘अ’पारदर्शक कारभार हळूहळू समोर येऊ लागला आहे. फ्लॅट देण्याच्या नावाखाली भारताचे माजी हॉकीपटू धनंजय महाडिक यांच्याकडून जवळपास ५० लाख रुपये उकळणाऱ्या बिल्डरला भाजपने तिकीट देऊन कोणता ‘पारदर्शक’ कारभार दाखवला आहे, हा प्रश्न सर्वाना पडत आहे.

महाडिक यांना फसवणाऱ्या बिल्डरला म्हणजेच विनय त्रिपाठीला भाजपने वॉर्ड क्रमांक २१३ (मुंबादेवी)मधून उमेदवारी दिली आहे. भायखळा पोलीस चौकीत महाडिक यांनी त्रिपाठीसह राजेश गोकानी आणि सुप्रीत मंजुनाथन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्रिपाठी आणि गोकानी हे मार्क कन्स्ट्रक्शनमध्ये भागीदार असून मंजुनाथन यांनी या व्यवहारात मध्यस्थीची भूमिका बजावली होती. ग्रँट रोड येथील मार्क गॅलेक्सी या पुनर्विकास प्रकल्पात महाडिक यांनी २३ सप्टेंबर २०११मध्ये दोन फ्लॅटसाठी ५० लाख रुपये दिले होते. त्यांना या फ्लॅटचा ताबा मिळणे अपेक्षित होते, परंतु परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. मार्क कन्स्ट्रक्शनकडून ही इमारत उभारण्यात येणार होती आणि या कंपनीच्या सहमालकांपैकी त्रिपाठी हे एक आहेत.

२०१३ मध्ये महाडिक यांनी माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती आणि त्यानंतर त्रिपाठी यांनी काही धनादेश देऊन वेळ मारून नेली. मात्र, हे धनादेश बाऊन्स झाले, असे महाडिक यांनी सांगितले. त्यानंतर वारंवार पाठपुरवठा करूनही सहा वर्षांनंतरही महाडिक यांच्या वाटय़ाला न्याय आलेला नाही. ‘‘मार्क कन्स्ट्रक्शनकडून देण्यात आलेले तीनही धनादेश बाऊन्स झाले आहेत. या पैशांचा राजकीय प्रचारासाठी वापर करण्यात आला असल्याचा संशय आहे,’’ असे महाडिक यांनी सांगितले.

हे षङ्यंत्र, महाडिक यांना न्याय मिळवून देणार

‘‘हा सहा वष्रे जुना विषय आहे आणि यात कोणताही वैयक्तिक वाद नाही. महाडिक यांची कंपनीविरोधात तक्रार आहे. मी या कंपनीचा भागीदार आहे आणि आमच्यात वाद झाल्यामुळे पुनर्विकासाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. त्यामुळे न्यायालयाने आमचे बँक खाते गोठवले आहे आणि त्यामुळे महाडिक यांना दिलेले धनादेश वठले नाहीत,’’ असा दावा विनय त्रिपाठी यांनी केला. ते पुढे म्हणाले की, ‘‘ मला उमेदवारी मिळू नये, यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, मला उमेदवारी मिळाल्याने अनेकांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळेच हे प्रकरण उकरले गेले असल्याचा संशय आहे. पण, महाडिक यांना न्याय मिळवून देईन.’’

[jwplayer zZz7idXw-1o30kmL6]

मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp transparency work issue former hockey player dhananjay mahadik vinay tripathi bjp candidate