पक्षाच्या झेंडय़ासोबत निळय़ा झेंडय़ाचीही सर्वपक्षीयांकडून खरेदी

‘दस हजार कमल, पाच हजार नीला’, ‘बीस हजार धनुष्यबाण, दस हजार नीला’, ‘बीस हजार घडी, बीस हजार नीला’, ‘दस हजार हाथ, दस हजार नीला’.. निवडणुका आल्या की कमळ, धनुष्यबाण, घडय़ाळ, हात अशा सगळ्यांसोबतच ‘निळ्या’ रंगाची जोडी कशी जमते याचे प्रचारसाहित्याच्या दुकानावर दिसणारे हे चित्र पुरेसे प्रातिनिधीक. कारण, निवडणुका आल्या की भगवा, तिरंगा अशा सगळ्याच रंगांच्या झेंडय़ांना निळा सर्वाधिक ‘मॅचिंग’ वाटू लागतो. यामुळेच जणू प्रचारसाहित्याच्या दुकानांमध्ये कोणत्याही झेंडय़ापेक्षा निळ्याला सर्वाधिक मागणी आहे.

यंदाच्या पालिका निवडणुकीत प्रत्येक मोठय़ा पक्षासोबत आंबेडकरी नेत्यांचा एक गट आहे. अर्जुन डांगळे यांचा गट सेनेसोबत तर रामदास आठवले यांचा गट भाजपासमवेत. त्यामुळे भाषणाचा शेवटही ‘जय िहद, जय महाराष्ट्र, जय भीम’ अशा घोषणेने होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनाही दलित नेत्यांना डावलून चालत नाही. म्हणूनच प्रत्येक पक्षाच्या प्रचारातही उमेवाराच्या गळ्यात भगव्या, तिरंग्यासह निळ्या रंगाचा पटका आवर्जून दिसतो. दलित आंबेडकरी जनतेची अथवा दलित राजकीय पक्षांची म्हणावी तशी ताकद नसली तरी अनेक प्रभागांमध्ये ही मते निर्णायक ठरतात. त्याची जाणीव प्रत्येक राजकीय पक्षाला असल्याने बाजारात निवडणूक साहित्यात निळे झेंडे, पटके यांना हमखास मागणी असते.

या दुकानांमध्ये हाताचा पंजा, घडय़ाळ, धनुष्यबाण, रेल्वे इंजिन यांच्यासह निळय़ा रंगाचे धम्मचक्राचे चिन्ह असणारे झेंडे अथवा पटके दिसून येतात. त्यांना मागणीही जोरदार असते. सध्या भाजपचे कार्यकत्रे मोठय़ा संख्येने निळ्या रंगाचे झेंडे आणि गळ्यातील पटके घेऊन जात आहेत. सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मात्र ही मागणी कमी झाली आहे, अशी माहिती एका व्यापाऱ्याने दिली. भाजप व आठवले गटाची गट्टी जमल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून निळ्या रंगाची मागणी वाढल्याचे दिसून येते. तरीही सेना, काँग्रेस अशा सर्वच पक्षांकडून निळ्या झेंडय़ांचा वापर प्रचारात केला जातो.  दलित राजकीय पक्षांनी  समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी युती वा आघाडीत प्रवेश केला. मुख्य प्रवाहातील पक्षांनी नेहमी आंबेडकरी जनतेच्या मतांसाठी दलित राजकीय पक्षांशी आणि कार्यकर्त्यांशी हातमिळवणी केली; पण त्यांचे अंदाज चुकले आहेत.

गेल्या काही दिवसांत सगळ्या पक्षांचे कार्यकत्रे निळ्या रंगाचे झेंडे, गळ्यातील पटके असे साहित्य विकत घेण्यास उत्साह दाखवत आहेत. सरासरी १०० झेंडे आपल्या पक्षाचे घेतल्यानंतर निळ्या रंगाचे ४० ते ५० झेंडे विकत घेतले जातात.

रमाकांत छेडा, निवडणूक साहित्य विक्रेता व्यापारी

पक्षानुसार निळ्या झेंडय़ाची मागणी कमी-अधिक आहे. ज्या प्रमुख पक्षाची युती आरपीआय किंवा तत्सम राजकीय पक्षांसोबत आहे, त्या पक्षाकडून मोठय़ा प्रमाणावर निळ्या रंगाच्या निवडणूक साहित्याची मागणी केली जाते.

एक व्यापारी

Story img Loader