सत्तेचा मार्ग सुकर झाल्याने निर्धास्त
महापौर निवडणुकीमध्ये घोडेबाजार टाळण्यासाठी आणि फाटाफूट होऊ नये यासाठी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर स्वपक्षाच्या नगरसेवकांची अज्ञातस्थळी रिसॉर्टवर रवानगी करण्याचा शिवसेनेचा बेत होता. मात्र भाजपने महापौर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने शिवसेनेने नगरसेवकांच्या रिसॉर्ट रवानगीचा बेत रद्द केला. त्यामुळे शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना घरची वाट धरावी लागली.
महापौर पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना अज्ञातस्थळी रिसॉर्टवर घेऊन जाण्याची व्यूहरचना शिवसेनेने आखली होती. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक खुशीत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सकाळी महापौर पदासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाची घोषणा केली.
तसेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना नेत्यांबरोबर निघालेल्या विश्वनाथ महाडेश्वर यांचे मनोबल वाढविण्यासाठी नगरसेवकांना दुपारी २.३०च्या सुमारास पालिका मुख्यालयात पोहोचण्याचा निरोप धाडण्यात आला. त्यानुसार शिवसेनेचे नगरसेवक पालिका मुख्यालयात पोहोचले. महाडेश्वर यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर भाजपकडून कोणती भूमिका घेतली जाते याची वाट पाहात शिवसेनेचे नगरसेवक पालिका मुख्यालयातच थांबले होते.
महापौर-उपमहापौर पदासह सर्वच वैधानिक समित्यांची निवडणूक न लढविण्याचा, तसेच विरोधी पक्षातही न बसण्याचा निर्णय भाजपने घेतला आणि पालिकेतील राजकीय समीकरणेच बदलून गेली. भाजपने अचानक माघार घेतल्यामुळे शिवसेना नगरसेवकांच्या चेहऱ्यावर कळी खुलली. शिवसेनेने भाजपला नमविले असे भाव शिवसेना नगरसेवकांच्या चेहऱ्यावर दिसू लागले. मात्र भविष्यात भाजप नगरसेवक पारदर्शकतेचे पाहारेकरी बनून काम करतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर शिवसेना नगरसेवकांच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली. मात्र मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसणार हे जवळजवळ निश्चित झाल्यामुळे शिवसेना नगरसेवक सुखावले. भाजपने माघार घेतल्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीतील मोठे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांना अज्ञातस्थळी नेण्याची गरज उरली नाही. त्यामुळे हा निर्णय शिवसेनेकडून रद्द करण्यात आला.
रिसॉर्टवर चार दिवस मौजमजा करण्याची संधी हुकल्याने काहीसे नाराज झालेले शिवसेना नगरसेवक अखेर संध्याकाळी पालिका मुख्यालयातून बाहेर पडले आणि त्यांनी घरची वाट धरली.