लोकशाहीत बहुमताला मोठे महत्त्व असते. परंतु मतदान करण्यातला निरुत्साह आणि उमेदवारांची मांदियाळी यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा न मिळालेल्या मतांची आकडेवारी नेहमीच जास्त असते. मुंबई महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीतही तेच चित्र दिसून आले असून विजयी झालेल्या २२७ नगरसेवकांना मिळालेली एकत्रित मते २० लाख आहेत. जवळपास सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईतील ९१ लाख मतदारांच्या तुलनेत विजयी नगरसेवकांना मिळालेल्या मतांचा टक्का अवघा २२ टक्के इतका आहे.
यंदा महापालिका निवडणुकीत ५० लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०११ मधील जनगणनेनुसार शहरातील लोकसंख्या १ कोटी २४ लाख असून निवडणूक आयोगाकडील नोंदीनुसार ९१ लाख मतदार आहेत. पाच वर्षांपूर्वी मतदारांची संख्या १ कोटी २ लाख होती. या वेळी काही लाख मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही, हे लक्षात घेतले तर शहरातील १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांची संख्या एक कोटीच्या घरात असू शकते. निकालातील आकडेवारी पाहता शहरातील २२७ प्रभागांमधून निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मतांची एकूण संख्या ही २० लाख १९ हजार आहे. म्हणजेच प्रौढ लोकसंख्येपैकी अवघ्या २० टक्के लोकांच्या पसंतीचे उमेदवार यावेळच्या पालिकेत गेले आहेत. तर नोंदणीकृत मतदारांचा विचार करता हा आकडा २२ टक्क्यांपर्यंत जातो.
या वेळी प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली आणि सरासरी ५५ हजार लोकसंख्येचे २२७ प्रभाग करण्यात आले. या वेळी प्रमुख पक्षांची युती- आघाडी न झाल्याने पक्ष वेगवेगळे लढल्यामुळे मतांमध्ये फूट पडली. सेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मतांची संख्या पाहता प्रत्येक नगरसेवकाला सरासरी ९ हजार मते मिळाली आहेत. याचाच अर्थ ५० ते ५५ हजार लोकसंख्येला, त्यांच्यामधील अवघ्या ९ हजार लोकांच्या पसंतीचा उमेदवार नगरसेवक म्हणून लाभला आहे.
साधारण सर्वच निवडणुकांमध्ये असा प्रकार दिसतो. आपल्याकडे ‘फर्स्ट पास द पोस्ट’ म्हणजे अधिक मते मिळवणाऱ्याला विजयी घोषित करण्याची पद्धत आहे. त्यामुळे तिरंगी किंवा चौरंगी निवडणुकांमध्ये १३ ते १५ टक्के मते मिळवूनही जिंकता येते. धर्म, जात, एखाद्या भावनिक मुद्दय़ावरून १० ते १५ टक्के मतदारांना स्वतकडे वळवणे सोपे असल्याने आपल्याकडे विकासाच्या मुद्दय़ाऐवजी अस्मितांचे राजकारण केले जाते. त्यामुळे फ्रान्सप्रमाणे किमान ५१ टक्के मते मिळवणाऱ्यालाच विजयी घोषित करावे व त्यासाठी घटनात्मक दुरुस्ती करावी, अशी सूचना आम्ही आधीच केली आहे, असे नॅशनल इलेक्शन वॉचचे संस्थापक सदस्य अजित रानडे यांनी सांगितले. इंग्लंडवरून ही निवडणूक पद्धत आपण उचलली असली तरी आता इंग्लंडमध्येही ही पद्धत बाद ठरवली गेली आहे, असेही ते म्हणाले.
- शहराची लोकसंख्या – १ कोटी २४ लाख
- निवडणूक आयोगाकडील मतदारांची संख्या – ९१ लाख
- प्रत्यक्ष मतदान – सुमारे ५० लाख
- २२७ नगरसेवकांना पडलेली एकूण मते – २० लाख १९ हजार ७५५
- प्रत्येक नगरसेवकाला पडलेली सरासरी मते – ८,८९८
- नगरसेवक प्रतिनिधित्व करत असलेल्या प्रभागांची सरासरी लोकसंख्या – ५४,६२५