भाजपमधूनच सवाल; मागाठणेत सेनाच
मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने गेल्या वर्षी विधान परिषदेची आमदारकी मनसेतून दाखल झालेल्या प्रवीण दरेकर यांना दिली होती; परंतु दरेकर यांच्या प्रभाव क्षेत्रातच भाजपचा पार धुव्वा उडाल्याने दरेकर यांच्या आमदारकीचा पक्षाला काय फायदा झाला, असा सवाल पक्षातच व्यक्त केला जात आहे.
मुंबै बँकेचे अध्यक्ष असलेल्या दरेकर यांना पक्षाने गेल्या वर्षी विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केल्यावर भाजपमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. पक्षाच्या मुख्यालयात घोषणाबाजी झाली होती. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दरेकर यांचा फायदा होईल, असे तेव्हा भाजप नेत्यांचे गणित होते. प्रत्यक्षात दरेकर यांनी २००९ ते २०१४ या काळात आमदारकी भूषविलेल्या मागाठणे मतदारसंघात भाजपचा पार धुव्वा उडाला.
दरेकर यांचे बंधू व विद्यमान नगरसेवक प्रकाश यांचाही पराभव झाला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रकाश सुर्वे यांनी तेव्हा मनसेतून निवडणूक लढविलेल्या दरेकर यांचा पराभव केला होता. गेल्या आठवडय़ात झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत मागाठणे मतदारसंघात येणाऱ्या सातपैकी सहा जागाजिंकून शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
आताही सुर्वे विरुद्ध दरेकर असाच सामना या मतदारसंघात झाला होता. पुन्हा एकदा सुर्वे यांनी बाजी मारली आहे. दरेकर यांच्या बंधूचा तर सहा हजार मतांनी पराभव झाला. या विजयाने शिवसेनेत प्रकाश सुर्वे यांचे महत्त्व वाढले आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये केवळ दोन जागांचे अंतर आहे.
सिंग यांच्यामुळे फायदा
दरेकर यांच्या प्रभाव क्षेत्रात चांगल्या यशाची अपेक्षा भाजप नेत्यांना होती; पण दरेकर यांनी पक्षाची अपेक्षा फोल ठरविल्याची प्रतिक्रिया भाजपच्या गोटातून व्यक्त केली जात आहे. दरेकर यांच्याबरोबरीने भाजपने उत्तर भारतीय समाजातील आर. एन. सिंग यांना आमदारकी दिली होती. उत्तर भारतीयांची मते भाजपला मिळतातच. पण सिंग यांच्यामुळे आणखी मते मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. दरेकर यांच्या तुलनेत सिंग यांचा फायदा झाल्याचे भाजपमध्ये बोलले जाते.