महापालिका निवडणुकीतील युतीबाबत चर्चा करण्यासाठी अखेर शिवसेना आणि भाजपला मुहूर्त सापडला आहे. सोमवारी दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होणार असून चर्चेच्या पहिला फेरीत दोन्ही पक्ष समाधानकारक तोडगा काढण्यात यशस्वी होतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आरोपप्रत्यारोपांमुळे शिवसेना आणि भाजपमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पण शेवटी दोन्ही पक्षांनी युती करण्याबाबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली. संक्रांतीमुळे युतीबाबतची चर्चा पुढे ढकलण्यात आली होती. रविवारी ही चर्चा होण्याची शक्यता होती. मात्र आता युतीबाबतच्या चर्चेला सोमवारचा मुहूर्त मिळाल्याचे समजते. बैठकीला शिवसेनेतर्फे अनिल परब आणि अनिल देसाई तर भाजपकडून आशिष शेलार आणि विनोद तावडे हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेनेवर हल्ला करून ‘लक्ष्यभेद’ करण्याची तयारी भाजपने चालविली आहे. तर महापालिकेतील गड उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी शिवसेनेकडूनही तटबंदी करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांची कडक हजेरी घेऊन त्यांना निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. दुसरीकडे भाजपनेही स्वबळाचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीमध्ये युतीचा निर्णय होणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, शिवसेना स्वबळावर लढल्यास मुंबईत शिवसेनाच क्रमांक एकचा पक्ष ठरू शकतो, असा अंदाज पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. शिवसेनेच्या ३० ते ४० जागा वाढतील, असेही सर्वेक्षणात म्हटले आहे. त्यामुळे स्वबळावर लढल्याचा लाभ शिवसेनेलाच अधिक होईल, असेही त्यात म्हटले आहे. स्वबळावर लढण्याची जोरदार तयारी शिवसेनेने सुरू केली असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी रोजी जन्मदिनानिमित्ताने आणि २६ जानेवारीला गटप्रमुखांच्या मेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. सत्तेच्या दबावापुढे न झुकता शिवसेना भाजपमागे फरफटत जाणार नाही, असे परखड प्रतिपादन करीत मुंबईत पाच वर्षे महापौर शिवसेनेचाच राहील, त्यात कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले. ‘पारदर्शी’पेक्षा ‘आरपार’च्या लढाईवर शिवसेनेचा विशास असून निवडणुकीच्या रणमैदानात महाभारत सुरू होईल, तेव्हाच आरपार काय असते, ते सर्वाना दिसेल, असा सणसणीत टोला राऊत यांनी लगावला होता.
दुसरीकडे भाजपनेही काही दिवसांपूर्वी पक्षांतर्गत सर्व्हे केला होता. त्यात भाजप स्वबळावर लढल्यास सर्वाधिक फायदा होईल. भाजपच्या शंभरहून अधिक जागा जिंकून येतील आणि पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरेल, असे सर्वेक्षणात आढळून आले होते. तर युती केल्यास शिवसेनेला लाभ होऊन महापौर त्यांचा होईल, असे त्यात म्हटले होते. तर स्वबळावर लढलो तर, किमान ८५ जागा तरी निश्चित मिळविता येतील, अशी खात्री भाजपच्या नेत्यांना वाटत आहे.