महापौरपदासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर अज्ञातस्थळी रवानगी
अतिशय अटीतटीच्या बनलेल्या मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्येक नगरसेवकाचे मत महत्त्वाचे असल्याने शिवसेनेने आतापासूनच आपले ‘संख्याबळ’ अतूट ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापौरपदासाठी सेनेच्या उमेदवाराचा अर्ज दाखल झाल्यानंतर पक्षाने नोंदणी केलेल्या ८८ नगरसेवकांची अज्ञातस्थळी रवानगी करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यासोबतच भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता असलेल्या अन्य पक्षांच्या नगरसेवकांवरही शिवसैनिकांमार्फत कडक नजर ठेवण्यात येत आहे.
येत्या ८ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत आपल्याच पक्षाचा महापौर बनेल, यासाठी शिवसेना-भाजपची जोरदार व्यूहरचना सुरू आहे. चार अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला असून अ. भा. सेनेच्या एकमेव नगरसेविका गीता गवळी यांनी शिवसेनेला हुलकावणी देत भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेने अत्यंत सावधपणे पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना शनिवारी अज्ञातस्थळी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर निवडणुकीच्या दिवशी म्हणजे ८ मार्च रोजी सकाळी या नगरसेवकांना पालिका मुख्यालयात आणण्यात येणार आहे. तोपर्यंत मुंबईजवळच्या एका रिसॉर्टमध्ये या सर्वाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर बारीक लक्षही ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फुटून भाजपला पाठिंबा देऊ नयेत यासाठी शिवसैनिकांची मोठी फौज त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे.
घोडेबाजाराचीही शक्यता
महापौरपदासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असून निवडणूक ८ मार्च रोजी होत आहे. तत्पूर्वी शिवसेनेपेक्षा अधिक संख्याबळाची जमवाजमव करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेसचे ३१ आणि राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक निवडून आले आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून एकतृतीयांश नगरसेवकांचा गट बाहेर पडला आणि त्यांनी शिवसेना अथवा भाजपला पाठिंबा दिल्यास महापौरपदाच्या निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे. असा गट काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडू शकतो का याची चाचपणी सध्या सुरू झाली आहे. त्यामुळे घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काँग्रेस नगरसेवकांशी भाजपचे काही नेते संपर्क साधत आहेत, मात्र असे असले तरी आम्ही काँग्रेस नगरसेवकांच्या संपर्कात आहोत. त्यामुळे दगाफटका होण्याची शक्यता नाही. काँग्रेसने महापौर निवडणुकीत आपला उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला असून काँग्रेसचे नगरसेवक पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करतील.
– संजय निरुपम, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस
राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. कायद्यानुसार महापौर निवडणुकीत हात उंचावून मतदान करायचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून कोणताही गैरप्रकार होणार नाही याबद्दल विश्वास आहे.
–सचिन अहिर, अध्यक्ष, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस