अनेक जण मतदानासाठी गावी जाण्याच्या बेतात
शहरात पालिका निवडणुकीची धुमाळी सुरू असताना मुंबईपासून शेकडो कोस दूर उत्तर प्रदेशातही विधानसभा निवडणुकीचे डिंडिम वाजले आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये अत्यंत रस असलेल्या मुंबईतील उत्तर प्रदेशवासीयांसमोर मात्र नेमके कुठे मतदान करायचे, हा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. एकाच मतदाराचे नाव दोन ठिकाणच्या मतदारसंघात नसते, मात्र अनेकदा ‘मुलुख’मधल्या मतदार यादीतील आपले नाव कमी करण्याच्या फंदात न पडलेल्या मतदारांची नावे मुंबईच्या यादीतही आहेत. या मतदारांना एक तर उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत किंवा महापालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याने अनेक पक्षांचेही धाबे दणाणले आहे. मात्र उत्तर भारतीय मतदारांवर विसंबून असलेल्या काँग्रेसच्या मते उत्तर प्रदेशातील निवडणुकीमुळे त्यांच्या मतदार संख्येवर काहीच परिणाम होणार नाही.
मुंबईतील १.२ कोटी लोकसंख्येपैकी ४० लाखांच्या आसपास लोकसंख्या उत्तर भारतीय आहे. यात उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आदी भागांतून मुंबईत आलेल्यांचा समावेश आहे. त्यापैकी २२ ते २५ लाख नागरिक उत्तर प्रदेशातील आहेत. या २२ ते २५ लाखांपैकी १०-१२ लाख लोकांच्या पिढय़ान्पिढय़ा मुंबईत राहणाऱ्या असल्याने त्यांचे नाव येथील मतदार यादीत नोंदवण्यात आले आहे. पण उर्वरित १२ ते १३ लाख लोकसंख्या अगदी काही वर्षांपूर्वी मुंबईत आल्याने त्यांच्यापैकी काहींची नावे यंदा मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत.
लोकसभा निवडणुकीदरम्यान मुंबईहून उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाडय़ांमधून भरभरून लोक मतदानासाठी गेले होते. हा इतिहास लक्षात घेता आता विविध टप्प्यांमध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशातील निवडणुकांसाठीही मुंबईतून मतदार जाण्याची शक्यता आहे.
असे झाल्यास उत्तर भारतीय मतदारांवर भिस्त ठेवून असलेल्या काँग्रेस, भाजप आणि सपा या तीन पक्षांना फटका बसेल. पूर्व उत्तर प्रदेशात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मतदान असले, तरी मुंबईत केलेल्या मतदानाची शाई वाळेपर्यंत या तारखा येत आहेत. त्यामुळे या मतदारांना उत्तर प्रदेशातील निवडणुकीत सहभाग घेणे शक्य नाही. तसेच आधीच्या टप्प्यात उत्तर प्रदेशात मतदानासाठी गेलेल्या मतदारांची शाई पालिका निवडणुकीच्या तारखेपर्यंत बोटांवरून पुसली जाणार नाही. त्यामुळे त्यांना मुंबई पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
उत्तर प्रदेशातील निवडणुकांमुळे काँग्रेसला मुंबईत फटका बसणार नाही. मुंबईतील उत्तर भारतीय येथेच मतदान करतात. निवडणुकीच्या कामासाठी उत्तर प्रदेशात जाणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. येथील निवडणुका मार्च महिन्यात असल्याने मुंबईतील निवडणुका आटोपल्यावर कामांसाठी लोक तेथे जाऊ शकतील.
– संजय निरुपम, अध्यक्ष, मुंबई प्रदेश काँग्रेस समिती
एखाद्या मतदाराचे नाव दोन ठिकाणी यादीत असेल, तरी त्याला एका वेळी एकाच ठिकाणी मतदानाचा हक्क बजावता येऊ शकतो. त्यामुळे उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्यांना मुंबईत हा हक्क बजावता येणार नाही.
– जगदीश मोरे, जनसंपर्क अधिकारी, निवडणूक आयोग