२२७ सदस्य असलेल्या मुंबई महानगर पालिकेमध्ये १७१ इतकी भरघोस मते पडून शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर महापौर झाले. शिवसेनेचे ८४ नगरसेवक असताना त्यांना १७१ सदस्यांनी मतदान केले. त्याचे कारण म्हणजे शिवसेनेला मिळालेली भारतीय जनता पक्षाची साथ. भारतीय जनता पक्षाच्या ८२ नगरसेवकांनी त्यांना आपले मत दिले. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मतदानाला येण्यापूर्वीच इतके उत्साही होते की त्यांनी भगवे फेटे घातले होते. त्यांच्या पेहरावाकडे पाहून असे वाटत होते की भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी शिवसेनेला मनापासून साथ दिली आहे. परंतु काही वेळातच भाजप नगरसेवकांनी मोदी मोदी असा जयघोष सुरू केला. त्यांच्या या कृत्यामुळे सभागृहात काय सुरू आहे हे काही वेळ समजलेच नाही. विश्वनाथ महाडेश्वर यांचा मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अजय मेहता सत्कार करत होते. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मोदी-मोदी असा जयघोष सुरू केला. त्यांच्या या जयघोषामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. कुठलिही अट न ठेवता महापौर निवडणुकीला शिवसेनेला मतदान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला हा आपलाच विजय वाटत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेनाचा विजय हा आपलाच नव्हे तर मोदींचा विजय आहे असे भारतीय जनता पक्षाला वाटत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा