शिवसेना नगरसेवकांचा सौम्य प्रतिकार; सभागृहात गोंधळ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मोदी, मोदी, मोदी, मोदी’ या काही भाजपच्या सभेतील घोषणा नव्हत्या, तर नव्या महापौरांचे स्वागत करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगमनाच्या वेळी भाजपच्या नगरसेवकांनी दिलेल्या घोषणा. त्यावर शिवसेना नगरसेवकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा घोष करीत भाजप नगरसेवकांना प्रत्युत्तर देण्याचा दुबळा प्रयत्न केला. परंतु भाजपच्या तरुण ब्रिगेडच्या गोंधळापुढे शिवसेना नगरसेवकांची घोषणाबाजी फिकी पडली!

नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौर हेमांगी वरळीकर यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी पालिका सभागृहात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  कुटुंबासह येताच भाजपच्या नगरसेवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवाचा गजर करीत सभागृहात अभूतपूर्व असा गोंधळ घातला. भाजपची निशाणी असलेले कमळाचे फूल दाखवून उद्धव ठाकरे यांना हिणवण्याचा प्रयत्न भाजप नगरसेवकांनी केला. एकीकडे शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करीत दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुखांना मोदी नामाचा गजर करीत हिणविल्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत होता. एरव्ही आरेला कारे करणारे शिवसेना नगरसेवक भाजपच्या गोंधळापुढे हतबल झाल्याचे चित्र बघायला मिळाले.

पालिका मुख्यालयाबाहेर कच्छी बाजा आणि ढोल-ताशाच्या तालावर शिवसैनिकांचा जल्लोष सुरू होता. पालिका मुख्यालयाच्या आवारात छोटेखानी व्यासपीठ उभारण्यात आले होते आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनस्थ मूर्ती ठेवण्यात आली होती. महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे पालिका मुख्यालयात पोहोचले. उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह विश्वनाथ महाडेश्वर आणि हेमांगी वरळीकर यांचे अभिनंदन करण्यासाठी सभागृहात येताच भाजपच्या नगरसेवकांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा गजर सुरू केला. उद्धव ठाकरे यांनी भाजप नगरसेवकांना हात उंचावून अभिनंदन करण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजप नगरसेवक काहीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी मोदी नामाचा गजर सुरूच ठेवला होता.

मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc elections 2017 bjp shiv sena congress party uddhav thackeray narendra modi