मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये सामना सुरु आहे. हा सामना रंगतदार अवस्थेत आला असतानाच, काँग्रेसही आपला उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. आता या अटीतटीच्या सामन्यात राज ठाकरे यांची ‘मनसे’मुळे चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी महापौरपदासाठीचा उमेदवारी अर्ज चिटणीस कार्यालयातून घेतला आहे. त्यामुळे मनसेही महापौरपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवार उतरवणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक येत्या ८ मार्च रोजी होत आहे. यासाठी ४ मार्चला उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये महापालिकेतील सत्तेसाठी रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही पक्षांमध्ये महापौरपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर कोणाचा बसणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेत शिवसेनेचे ८४, भाजपचे ८२, मनसे ७, राष्ट्रवादी काँग्रेस ९, काँग्रेस ३१, अभासे १, एमआयएम २ आणि अपक्ष ५ असे पक्षीय बलाबल आहे. पाचपैंकी चार नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ८८ झाले आहे. तर भाजपला एका अपक्ष आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ ८४ वर पोहोचले आहे. सत्तेसाठी दोघांमध्ये स्पर्धा लागली आहे. शिवसेनेतून यशवंत जाधव, आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर, रमेश कोरगावकर यांची नावे चर्चेत आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदी यशवंत जाधव याची नियुक्ती करण्यात आल्याने तब्बल दोन वेळा महापौरपदाची हुलकावणी देणाऱ्या यशवंत जाधव याचा पत्ता पुन्हा कट झाला आहे, असे मानले जाते. जर खुल्या प्रवर्गातून महिला नगरसेवकाला महापौरपदी बसवण्याचा विचार झाल्यास माजी महापौर विशाखा राऊत, राजुल पटेल, शुभदा गुडेकर, किशोर पेडणेकर यांचीही नावे चर्चेत आहेत. भाजपलाही महापौरपदाची संधी असल्याने त्यांनीही मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपमधून माजी आमदार अतुल शाह, डॉ. राम बरोट, मनोज कोटक याची नावे चर्चेत आहेत. कोटक यांची गटनेतापदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापौरपद मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून आकड्यांची जुळवाजुळव सुरू आहे. आता हा आकड्यांचा खेळ जिंकण्यात कुणाला यश मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात काँग्रेसपाठोपाठ आता मनसेनेही चुरस निर्माण केली आहे. मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मनसेच्या गटनेतेपदी दिलीप लांडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनीही महापौरपद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज चिटणीस कार्यालयातून घेतला आहे. मात्र, अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी उद्या अर्ज भरण्यात येणार आहे. मनसे आपला उमेदवार रिंगणात उतरवणार का? हे उद्याच स्पष्ट होईल.