गृहनिर्माण संस्थांच्या भिंतींचे राजकीय विद्रुपीकरण

‘स्वच्छ मुंबई’च्या बाता मारणाऱ्या उमेदवारांकडून सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर भित्तीपत्रके चिकटवून विद्रुपीकरण सुरू असल्याने रहिवाशी त्रासून गेले आहेत. आजुबाजूचे रस्तेच नव्हे तर अनेक गृहनिर्माण संस्थांमधील भिंतीही उमेदवारांच्या प्रसिद्धीच्या भित्तीपत्रकांनी भरून गेल्या आहेत. एकदा ही पत्रके काढून टाकल्यावर दुसऱ्या उमेदवाराचे कार्यकर्ते त्यावर नवीन भित्तीपत्रके लावून जातात. त्यामुळे मते हवी तर हे विद्रूपीकरण थांबवा, असे बजावण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे.

न्यायालयाच्या निर्णयामुळे फलकबाजीवर मर्यादा आल्याने प्रसिद्धीसाठी जे जे म्हणून मार्ग अवलंबता येतील ते ते सध्या सर्वच पक्षाच्या उमेदवारांकडून अवलंबले जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे भित्तीपत्रके. ज्या ज्या गृहनिर्माण संस्था, चाळींमध्ये उमेदवार प्रचारासाठी जातात त्या त्या ठिकाणी कार्यकत्रे भित्तीपत्रके भिंतींवर चिकटवून जातात. अनेक ठिकाणी तर सोसायटय़ांनी लावलेल्या नोटीसांवरच ही भित्तीपत्रके डकवली जातात. मतदारांच्या ‘नजरेत’ राहावे म्हणून उद्ववाहकांच्या (लिफ्ट) शेजारची जागा कार्यकर्त्यांची विशेष आवडीची आहे. मोठय़ा सोसायटय़ांमध्ये जिने, इमारतीतील भिंती आणि कधीतरी तर रहिवाश्यांच्या दरवाज्यावरील नावाच्या पाटीवरच भित्तीपत्रके लावली जातात. भिंतींवर चिकटवलेली भित्तीपत्रके सहजासहजी निघत नाहीत. ओरबडून काढण्याचा प्रयत्न केल्यास ती अर्धवट निघतात. परिणामी भिंत अधिक विद्रूप होते. या सगळ्यामुळे रहिवाशी त्रासून गेले आहेत.

काही ठिकाणी तर कार्यकत्रे उद्ववाहक बंद होताच त्याच्या बंद दरवाज्याला स्टिकर लावतात. त्यामुळे उद्ववाहकाचे दार सहजासहजी उघडत नाही. तर काही इमारतींच्या जिन्यालाच भित्तीपत्रकांची रांग लागलेली सध्या पहायला मिळत आहे. काहीवेळा एखादा उमेदवार आधीच त्या ठिकाणी प्रचार करून गेला असतो. मग दुसऱ्या उमेदवाराचे कार्यकर्ते त्यावर आपल्या नेत्याची छबी डकवतात. त्यामुळे प्रभागात साधारण चार उमेदवार असतील तर एकावर एक लावलेले स्टिकरचे असे थर पाहायला मिळत आहेत.

या सगळ्या प्रकारामुळे अनेक सोसायटय़ांच्या भिंती पत्रकांनी रंगल्या आहेत. वडाळ्यातील एका सोसायटीने या प्रकाराविरोधात पालिकेला निवेदन देण्याचे ठरविले आहे. तर एका सोसायटीने मते हवी असतील तर ही पत्रके चिकटविणे थांबवा, असे एका उमेदवाराला सुनावले आहे.

Story img Loader