रणधुमाळी -दक्षिण मध्य मुंबई
मुंबईतील लोकसभा मतदारसंघांपकी शिवसेनेचा वरचष्मा असलेला मतदारसंघ म्हणून दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. इंदिरा गांधी यांच्या हत्येपर्यंत म्हणजेच १९८४ पर्यंत या भागात काँग्रेसचा खासदार निवडून येत होता, पण १९८९ पासून २००९चा अपवाद वगळला, तर सातत्याने शिवसेनेचे प्राबल्य या मतदारसंघात राहिले आहे. असे असले, तरी गेल्या काही वर्षांमध्ये बदललेली परिस्थिती लक्षात घेता यंदाची महापालिका निवडणूक शिवसेनेला या भागात कठीण जाऊ शकते. या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापकी तीन जागांवर शिवसेनेचा, दोन जागांवर काँग्रेसचा आणि एका जागेवर भाजपचा आमदार निवडून आला होता. म्हणजेच पालिका निवडणुकांमध्येही या तीन पक्षांना या भागातील ३६ जागांसाठी झुंज द्यावी लागणार आहे.
[jwplayer FXuZnzpt]
यापकी धारावी विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. १९८० पासून या भागात काँग्रेसचा आमदार निवडून येत आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये वर्षां गायकवाड यांनी या भागातून विजय मिळवला आहे. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्येही या भागाकडून काँग्रेसला जास्तीत जास्त अपेक्षा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्याचा फायदा वर्षां गायकवाड यांना झाला होता. यंदा पालिका निवडणुकीतही तसेच चित्र असल्याने या परिस्थितीचा फायदा उठवण्याची काँग्रेसला संधी आहे.
सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात संमिश्र परिस्थिती आहे. या भागात भाजपचे कॅ. आर तमिळ सेल्व्हन हे आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत ४० हजार मते मिळवून निवडून आले होते. यंदा त्यांनी या भागातील एका प्रभागातून आपल्या भावाला उमेदवारी दिल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यातच सेना-भाजप युती नसल्याने येथे चुरशीची लढत दिसेल. २००९ मध्ये या भागातून काँग्रेसचे जगन्नाथ शेट्टी निवडून आले होते. त्या निवडणुकांमध्ये मनसे हा प्रभावशाली असल्याने त्या पक्षाने सेना-भाजप युतीच्या उमेदवारापाठोपाठ मते घेतली होती. या भागातील सात जागांपकी किमान तीन जागा पटकावण्यासाठी काँग्रेसने जोर लावला आहे.
एका बाजूला उच्चभ्रू वस्ती आणि दुसऱ्या बाजूला कष्टकरी वर्ग अशी विभागणी असलेला चेंबूर विधानसभा मतदारसंघ नेहमीच संमिश्र राहिलेला आहे. या भागात भाजप आणि काँग्रेस यांचे समसमान प्राबल्य आहे. गेल्या निवडणुकीत या भागातून चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करून शिवसेनेचे प्रकाश फातर्फेकर निवडून आले; पण गुरुदास कामत यांनी यंदा या भागातही जोर लावल्याने काँग्रेसला पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांमध्ये जागा जिंकण्याची संधी आहे.
अणुशक्ती नगर या विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये तुकाराम काते निवडून आले खरे, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांचा अवघ्या एक हजार मतांनी पराभव झाला होता. यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये असेच चित्र या भागात दिसून येण्याची शक्यता आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोजक्या नगरसेवकांपकी दोन या भागातून निवडून येण्याची शक्यता आहे; पण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी नसल्याने मतांचे विभाजन कसे होते, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील.
वडाळा विधानसभा मतदारसंघात सध्या काँग्रेसचे कालिदास कोळंबकर आमदार आहेत. सलग दुसऱ्यांदा या प्रभागातून निवडून आलेल्या कोळंबकर यांच्यासमोर महापालिका निवडणुकीत या भागात काँग्रेसचे वर्चस्व निर्माण करण्याचे आव्हान आहे. शिवसेनेने यंदा या भागात जोर लावला असला, तरी या भागात काही ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांबाबत नाराजी आहे. दुसऱ्या बाजूला कोळंबकर यांनी आपल्या मर्जीतल्या उमेदवाराला काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून दिल्यानंतर कोळंबकर यांचे निकटवर्तीय थवई यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
माहीम मतदारसंघ हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघात २००९ मध्ये मनसेच्या नितीन सरदेसाई यांनी विजय मिळवत सेनेला पहिला धक्का दिला. त्यानंतर २०१२च्या पालिका निवडणुकांमध्ये या भागातील सातही जागांवर मनसेचे नगरसेवक निवडून आल्यामुळे शिवसेनेचे नाक कापले गेले. आता या वेळी शिवसेना या सातही जागा पुन्हा मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे; पण मनसेनेही या भागात जोर लावला असून सातपकी किमान चार जागा राखण्यासाठी धडपड सुरू आहे. यापकी दोन जागांवर मनसेचा विजय निश्चित असल्याचे राजकीय अंदाज वर्तवले जात असले, तरी प्रत्यक्षात येथे चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
मराठी मतांसाठी चुरस
मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या प्रभागातून पत्नी स्वप्ना देशपांडे यांना निवडणुकीत उतरवले आहे. शिवसेनेने त्यांना लढत देण्यासाठी माजी महापौर विशाखा राऊत यांना उमेदवारी दिली आहे. शहरात इतरत्र कुठेही फारशी आशा नसलेल्या मनसेने ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. वॉर्ड क्रमांक १९४ मधून मनसेचे विद्यमान नगरसेवक संतोष धुरी आणि सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान यांच्यात लढत होत आहे. गेल्या वेळी मराठी मतांची विभागणी होऊन धुरी थोडय़ा फरकानेजिंकले होते. या वेळी माहिम, प्रभादेवी, वरळी या मराठीबहुल भागांतील सर्वच लढती औत्सुक्यपूर्ण ठरतील.
[jwplayer 7r7NMMzh]