मुंबई, ठाण्यासह दहा महानगरपालिका आणि ११ जिल्हा परिषद व ११८ पंचायत समित्यांसाठीचे मतदान मंगळवारी सुरू आहे. यात मुंबई महानगरपालिकेवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. युती, आघाडी मोडून सर्वच पक्ष यंदा मुंबईत स्वबळावर आपली ताकद आजमावत आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणत्या पक्षाला मतदान केले असा प्रश्न निर्माण झाला. कारण मुंबईतल्या ज्या वॉर्डात पवार यांची नोंदणी आहे. त्या वॉर्डात राष्ट्रवादीने उमेदवारच दिलेला नाही. त्यामुळे शरद पवार जेव्हा मतदानासाठी मतदान केंद्रावर जातील त्यावेळी कोणत्या पक्षाला मतदान करणार याबाबत आता चर्चा सुरू झाली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास पवार यांनी महालक्ष्मी येथे बुथ क्रमांक ११ वर मतदानाचा हक्क बजावला.

वाचा: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे सर्व अपडेट्स

मुंबईतील वॉर्ड क्रमांक २१४ मध्ये पवार यांचे मतदान आहे. या वॉर्डात शिवसेनेकडून अरविंद बने, भाजपकडून अजय पाटील, काँग्रेसचे कौशिक शहा आणि मनसेकडून धनराज नाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या वॉर्डात उमेदवारच दिलेला नाही. त्यामुळे शरद पवार यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीचा हक्क बजावताना आपल्या पक्षाव्यतिरिक्त मतदान करण्याची नामुष्की ओढावली.

शिवसेना आणि भाजप यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे मुंबई महानगर पालिकेची ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीनेही स्वबळाचा नारा दिला. मुंबईत राष्ट्रवादीची पाळेमुळे घट्ट नसल्याने उमेदवार शोधताना पक्षाच्या नाकीनऊ आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पक्षाला अनेक ठिकाणी उमेदवारच देता आलेले नाहीत. यंदाची निवडणूक शिवसेना आणि मनसे या स्थानिक पक्षांसाठी अस्तित्त्वाची लढाई ठरणार आहे. तर आक्रमक प्रचार आणि सुनियोजित रणनीती यांच्या जोरावर भाजप शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.