जोगेश्वरीतील उद्यानाचे श्रेय जाहिरातीतून लाटण्याचा प्रयत्न

भाजपशी प्रतिष्ठेचा केलेला मुंबई महापालिका निवडणुकीचा ‘सामना’ जिंकण्याच्या नादात जोगेश्वरीमध्ये काँग्रेसच्या माजी मंत्र्यांनी पुढाकार घेऊन केलेल्या कामाचे श्रेयही शिवसेनेने जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या नावावर खपवल्याची बाब उघड होत आहे. ‘महापालिकेची हरितक्रांती’ या मथळ्याखाली राणीच्या उद्यानातील पेंग्विन योजना, वांद्रय़ाचे नंदादीप उद्यान, विक्रोळीचे गुरू गोविंद सिंग गार्डन यांबरोबरच जोगेश्वरीतील ‘अशोक कामटे उद्यान’ हे तलाव उद्यान महापालिकेच्या माध्यमातून विकसित केल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. शिवसेनेच्या या जाहिरातबाजीवर काँग्रेसचे माजी आमदार सुरेश शेट्टी यांनी आक्षेप घेतला असून हे तलाव उद्यान २०११मध्ये आपण तत्कालीन पर्यटनमंत्री असताना राज्य सरकारच्या निधीतून विकसित केल्याचे स्पष्ट केले आहे.

दोन दिवसांपूर्वी मराठी-इंग्रजीत पक्षाच्या मुंबईतील कामाची जाहिरात करताना वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या आठ पानी पुरवणीत  ‘ग्रीन रिव्हॉल्युशन ऑफ बीएमसी’ या मथळ्याखाली शिवसेनेने मुंबईतील विविध भागातील उद्यानांची छायाचित्रे छापली होती. त्यात जोगेश्वरीच्या अशोक कामटे गार्डनचेही छायाचित्र आहे. हे छायाचित्र पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसल्याचे शेट्टी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

तत्कालीन पर्यटनमंत्री असताना २०११मध्ये या उद्यानाची संकल्पना मांडण्याबरोबरच ते विकसित करण्याकरिता आपण पुढाकार घेतला होता. सरकारच्या निधीतून हे उद्यान विकसित करण्यात आले. या उद्यानाचे काँग्रेसचे नेते गुरुदास कामत आणि अभिनेते चंकी पांडे यांच्या उपस्थितीत तेव्हा उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर २०१२ मध्ये ते महापालिकेकडे देखभालीकरिता सुपूर्द करण्यात आले,’ असे शेट्टी यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांत या उद्यानाची देखभालीअभावी रया गेली आहे. जलपर्यटनाकरिता आणलेल्या दोन बोटी मोडीत निघाल्या असून उर्वरित दोन बोटी वापराविना पडून आहेत. ‘पालिकेच्या माध्यमातून शिवसेनेने किमान या उद्यानाची देखभाल योग्यपणे होईल याची काळजी घ्यायला हवी होती. मात्र तीही जबाबदारी त्यांना नीट सांभाळता आली नाही. काही वर्षांपूर्वी शिवसेनेच्या एका नेत्याने या उद्यानाला २६/११ च्या हल्ल्यात हुतात्मा झालेले पोलीस अधिकारी अशोक कामटे यांचे नाव दिले. मात्र, त्यानंतरही हे उद्यान दुर्लक्षित राहिले,’ अशी तक्रार शेट्टी यांनी केली.

उपनगरवासीयांकरिता विरंगुळा

या विस्तीर्ण उद्यानात मोठा तलाव परिसर विकसित करण्यात आला आहे. वर्षांचे ३६५ दिवस त्यात पाणी राहील याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यात विविध प्रकारचे मासे, बदके सोडण्यात आली होती. तसेच, सर्वसामान्यांकरिता मोफत जलपर्यटनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. लहान मुलांकरिता तलावावर बांधण्यात आलेला ‘रोप ब्रिज’ हे या उद्यानाचे खास आकर्षण होते. उद्यानाच्या मागील बाजूस एक अ‍ॅम्फी थिएटर बांधण्यात आले आहे. हे उद्यान केवळ अंधेरी-जोगेश्वरीवासीयांनाच नव्हे तर उपनगरवासीयांकरिताही विरंगुळ्याचे ठिकाण बनले होते.

या संदर्भात शिवसेनेचे जोगेश्वरीचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्याशी संपर्क  साधण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्यांच्याशी संपर्ख होऊ शकला नाही.