• प्रभागफेरीएसविभाग
  • अंतर्गत भाग : नाहूर, भांडुप, पवई व कांजूर मार्ग

कुणे एकेकाळी हा परिसर निर्जन होता. कोकणातून कामधंद्याच्या निमित्ताने चाकरमानी मुंबईत आले आणि हळूहळू ते भांडूप आणि आसपासच्या उपनगरांमध्ये विसावू लागले. कालौघात मोठय़ा प्रमाणावर लोकवस्त्या उभ्या राहिल्या. बैठय़ा घरांसोबतच छोटय़ा-छोटय़ा टेकडय़ांवर झोपडपट्टय़ा दिसू लागल्या आणि हा परिसर गजबजून गेला. पवई परिसरात अनेक उत्तुंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीवासीय असा संमिश्र लोकवस्ती असलेलाय हा परिसर. पूर्व उपनगरवासीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा एल.बी.एस. मार्ग याच परिसरातून पुढे जातो. भांडूप जलशुद्धीकरण संकुल हा पालिकेचा मोठा प्रकल्प याच भागात. तलावातून येणारे अशुद्ध पाणी या प्रकल्पामध्ये शुद्ध केले जाते आणि पुढे ते विविध भागामध्ये जलवाहिन्यांच्या माध्यमातून पोहोचविले जाते. त्याशिवाय पवई, विहार तलाव आणि पवई तलावाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर थिम पार्क यासह आसपास बहरलेली उद्याने केवळ स्थानिक रहिवाशीच नव्हे तर देशी-विदेशी पर्यटकांची आकर्षणस्थाने बनली आहेत. २६ जुलै २००५ मध्ये मुंबईला आपल्या मगरमिठीत घेणाऱ्या मिठी नदीचा उगर विहार तलावाजवळून होतो. भांडूपमधील मधुबन गार्डन, शिवाजी तलाव, कांजूरमधील शहीद जयवंत पाटील उद्यान अशी काही ठराविक विरंगुळ्याची ठिकाणे या परिसरात आहेत. ‘एस’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील परिसर आता वेगाने कात टाकू लागला आहे. चाळींची जागा टॉवर घेऊ लागले आहेत. त्यामुळे भविष्यात या परिसराचे चित्रच बदलून जाणार आहे.

एक प्रभाग वाढला

या परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन प्रभाग फेररचनेत येथे एक प्रभाग वाढविण्यात आला आहे. यापूर्वी विभाग कार्यालयाच्या हद्दीत १३ प्रभागांमधून नगरसेवक निवडून येत होते. आता आगामी निवडणूक १४ प्रभागांमध्ये होणार आहे.

पुनर्विकासाचा प्रश्न

गेल्या काही वर्षांमध्ये भांडूपपासून थेट नाहुपर्यंतच्या परिसरात पुनर्विकासाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी येत्या दोन-तीन वर्षांमध्ये उत्तुंग टॉवर उभे राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या परिसरातील लोकसंख्या आणि वाहनसंख्येत मोठी वाढ होऊन नव्या  समस्या निर्माण होण्याची शक्यता नाही. पायाभूत सुविधांचे जाळे भक्कम नसल्यामुळे अतिरिक्त ताण येऊन त्या कोलमडू शकतात. अरुंद रस्त्यांचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे. अन्यथा वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच जटील बनू शकतो.

प्रभागांच्या समस्या

जल अशुद्धीकरण

पालिकेच्या मोठय़ा तलावांपैकी एक पवई तलाव. या तलावाजवळच जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. राष्ट्रीय उद्यानाचा भाग असल्याने या भाग वृक्षवल्लीनी नटला आहे. तलावाशेजारीच असलेल्या टेकडीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान उभे राहिले आहे. पर्यटकांसाठी हे उद्यान एक पर्वणी म्हणावे लागेल. मात्र तलावाच्या आसपासच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर गृहनिर्माण संकुले उभी राहिली आहेत. या संकुलांतील सांडपाणी पवई तलावामध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे तलावातील पाणी दूषित बनले आहे. त्याचा फटका तलावातील जीवसृष्टीला बसत आहे. अवैध मासेमारी, जलविहार आदी प्रश्न निर्माण झाले आहेत. याकडे पालिकेने गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे हे प्रश्न चिघळू लागले आहेत.

कचराभूमी आरोग्याच्या मुळावर

मुंबईमधील विविध ठिकाणचा कचरा कांजूर येथील कचराभूमीत टाकण्यात येतो. या कचराभूमीची क्षमता संपुष्टात आली आहे; मात्र कचरा टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे कांजूर कचराभूमीचा वापर आजही सुरूच आहे. कचराभूमीत ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण आणि खतनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. कचराभूमीतील दरुगधी विक्रोळीपासून थेट भांडुपपर्यंतच्या परिसरात पसरत असल्याने ‘एस’ विभाग कार्यालयातील रहिवासी हैराण झाले आहेत. दरुगधीमुळे रहिवाशांच्या आरोग्याचे प्रश्नही निर्माण होऊ लागले आहेत. दरुगधी पसरू नये म्हणून कचराभूमीतील कचऱ्याच्या ढिगावर रासायनिक द्रव्याची फवारणी करण्याचा तोडगा प्रशासनाने काढला होता. मात्र तरीही दरुगधी कमी होत नसल्याने रहिवासी हैराण झाले होते. या कचराभूमीत कचरा टाकणे थांबवावे अशी मागणी रहिवाशांकडून वारंवार करण्यात येत आहे.

झोपडपट्टय़ांचे डोंगर

‘एस’ विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये सूर्यनगर, महात्मा फुले नगर, हनुमान नगर, रमाबाई नगर, प्रताप नगर, रावते कंपाउंड, राम नगर, चाफ्याचा पाडा, खिंडी पाडा, तुळशेत पाडा, साई हिल, साई विहार आदी झोपडपट्टय़ा उभ्या आहेत. यापैकी बहुतांश झोपडपट्टय़ा टेकडय़ांवर वसल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांना कायम पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न भेडसावत असतात. उंचावर पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत असल्यामुळे पालिकेने काही ठिकाणी जलकुंभ उभारून टेकडीवरील वस्तीमध्ये पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तरीही रहिवाशांना अपुरेच पाणी मिळत आहे.

नाले, गटारांची समस्या

अनेक ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्यांचे सक्षम असे जाळे नाही. अनेक झोपडपट्टय़ांमधून नाल्यांमध्येच मल आणि सांडपाणी सोडण्यात येते. त्याचबरोबर मोठय़ा प्रमाणावर नाल्यांमध्ये कचरा टाकला जातो. त्यामुळे नाले तुंबतात. तशीच अवस्था या परिसरातील गटारांची झाली आहे.

वाहतूक कोंडी

पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या एलबीएस रोडच्या रुंदीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळला आहे. तसेच या परिसरातील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी या भागात कायम वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. कुर्ला येथून थेट ठाण्यापर्यंत एलबीएस मार्गावरून मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात एलबीएस रोडवरील वर्दळीमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जे. जे. उड्डाणपुलाप्रमाणे एखादा मोठा पूल एलबीएस रोडवर बांधावा अशी मागणी येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. भांडुपमधील अरुंद रस्त्यांमुळे रहिवाशांना कायमच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. इतकेत नव्हे तर रहिवाशांना सेवा मिळावी म्हणून भांडुपमधील अरुंद रस्त्यांवर ‘बेस्ट’ला मिनी बसगाडय़ा चालवाव्या लागत आहेत.

लोकप्रतिनिधी केवळ लादीकरण, शौचालयांचे दरवाजे बदलणे, रस्त्यावरील लाइट बदलणे अशी कामे करण्यात धन्यता मानतात. या भागात चांगली खेळाची मैदाने, उद्याने, रुग्णालये उभारण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत. आठ-नऊ वर्षांपूर्वी पवई तलावाच्या सुशोभीकरणावर पालिकेने कोटय़वधी रुपये खर्च केले. आता पुन्हा तलावाच्या सुशोभीकरणाचा आराखडा आखण्यात आला असून पूर्वीच्या आराखडय़ातील अनेक गोष्टींचा त्यात समावेश आहे. पवई तलावातील विशिष्ट भागात मगरींचे उद्यान साकारण्याची मागणी केली जात आहे.

s-ward1

s-ward2

सुनीश कुंजू, पर्यावरणविषयक कार्यकर्ता

कांजूर कचराभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर कचराभूमीचा प्रश्न सोडविण्याचे नाटय़ रंगते. पण आजही दरुगधीतून या परिसरातील रहिवाशांची सुटका झालेली नाही. येथील अनेक पदपथांवर झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे पदपथ अस्वच्छ झाले आहेत.

रमाकांत पवार, रहिवासी, भांडुप

एलबीएस रोडच्या रुंदीकरणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे रेंगाळला आहे. काही ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत; परंतु कामे संथगतीने सुरू असल्याने वाहतूक कोंडी होऊन त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. भांडुपमध्ये काही महिन्यांपूर्वी कचराकुंडी उचलून नेण्यात आली.

रमेश पिल्ले, समाजसेवक