- ‘प्रभाग’फेरी ‘एस’ विभाग
- अंतर्गत भाग : नाहूर, भांडुप, पवई व कांजूर मार्ग
कुणे एकेकाळी हा परिसर निर्जन होता. कोकणातून कामधंद्याच्या निमित्ताने चाकरमानी मुंबईत आले आणि हळूहळू ते भांडूप आणि आसपासच्या उपनगरांमध्ये विसावू लागले. कालौघात मोठय़ा प्रमाणावर लोकवस्त्या उभ्या राहिल्या. बैठय़ा घरांसोबतच छोटय़ा-छोटय़ा टेकडय़ांवर झोपडपट्टय़ा दिसू लागल्या आणि हा परिसर गजबजून गेला. पवई परिसरात अनेक उत्तुंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीवासीय असा संमिश्र लोकवस्ती असलेलाय हा परिसर. पूर्व उपनगरवासीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा एल.बी.एस. मार्ग याच परिसरातून पुढे जातो. भांडूप जलशुद्धीकरण संकुल हा पालिकेचा मोठा प्रकल्प याच भागात. तलावातून येणारे अशुद्ध पाणी या प्रकल्पामध्ये शुद्ध केले जाते आणि पुढे ते विविध भागामध्ये जलवाहिन्यांच्या माध्यमातून पोहोचविले जाते. त्याशिवाय पवई, विहार तलाव आणि पवई तलावाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर थिम पार्क यासह आसपास बहरलेली उद्याने केवळ स्थानिक रहिवाशीच नव्हे तर देशी-विदेशी पर्यटकांची आकर्षणस्थाने बनली आहेत. २६ जुलै २००५ मध्ये मुंबईला आपल्या मगरमिठीत घेणाऱ्या मिठी नदीचा उगर विहार तलावाजवळून होतो. भांडूपमधील मधुबन गार्डन, शिवाजी तलाव, कांजूरमधील शहीद जयवंत पाटील उद्यान अशी काही ठराविक विरंगुळ्याची ठिकाणे या परिसरात आहेत. ‘एस’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील परिसर आता वेगाने कात टाकू लागला आहे. चाळींची जागा टॉवर घेऊ लागले आहेत. त्यामुळे भविष्यात या परिसराचे चित्रच बदलून जाणार आहे.