आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्र्यांच्या पक्षनेत्यांना सूचना; सोयीस्कर युती नको-सेना

भाजपने आगामी महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या नेत्यांना दिल्या आहेत व जोरदार तयारी सुरू आहे. मात्र शिवसेनेशीच युती करण्याची आमची भूमिका असून स्थानिक पातळीवर चर्चेचे अधिकार दिल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी सांगितले. तर शिवसेनेला मात्र प्रादेशिक पातळीवर युतीची चर्चा अपेक्षित असून केवळ भाजपला सोयीच्या ठिकाणी युती करणार नाही, केली तर सर्व महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये केली जाईल, असे शिवसेनेतील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ स्थानिक पातळीवर सुरू  होणार असले तरी त्यातून फारसे निष्पन्न होण्याची शक्यता कमी आहे.

भाजप व शिवसेनेनेही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू ठेवली असली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युती करावी, हे आमच्या मनात असल्याचा सूर सुरुवातीपासूनच आळवीत आहे.  निवडणूक आयोगाकडून १० महापालिका व २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा एक-दोन दिवसांत होणे अपेक्षित आहे. त्यामुळे  फडणवीस यांनी ‘वर्षां’ निवासस्थानी भाजप मंत्री, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार व प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेऊन युतीसाठी चर्चा करण्याबरोबरच स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

मात्र शिवसेनेला भाजपची भूमिका फारशी मान्य नसून प्रादेशिक पातळीवरच चर्चा करावी, असे पक्षाचे मत आहे. भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडय़ांचे राजकारण करून कोणाशीही युती केली. मात्र शिवसेनेने केवळ भाजपशी युती केली.

आगामी निवडणुकाही शिवसेना धनुष्यबाण याच चिन्हावर लढविणार असून आघाडीचे राजकारण करणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे केवळ भाजपला सोयीच्या जागी शिवसेना युती करणार नसून केली तर सर्व ठिकाणी अन्यथा नाही, हीच शिवसेनेची भूमिका राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

स्थानिक पातळीवर सुरुवात

भाजपने नगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जोरदार कामगिरी करून आमची ताकद दाखवून दिली आहे. पण आम्हाला शिवसेनेशी युती हवी असून चर्चेला स्थानिक पातळीवर सुरुवात होईल. पक्षाची त्या ठिकाणची ताकद लक्षात घेऊन जागावाटप करण्याचा अधिकारही त्यांनाच आहे, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis give order to fight election individually