नगरसेवक पत्नींचा प्रभाग खुला झाल्याचा फायदा
प्रभागांच्या आरक्षणामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांच्या कारकिर्दीला यंदा ‘ब्रेक’ लागणार असला तरी पाच वर्षांपूर्वी आरक्षणामुळेच ‘सक्तीच्या रजेवर’ गेलेले काही माजी नगरसेवक येत्या निवडणुकीत ‘कमबॅक’ करण्याच्या मार्गावर आहेत. २०१२ मध्ये महिलांसाठी प्रभाग आरक्षित झाल्याने पत्नीला निवडणुकीत उभे करण्याची वेळ आलेल्या अनेक माजी नगरसेवकांना यावेळी आरक्षण बदलल्याने फायदा झाला आहे. गेल्या वेळचे आरक्षित विभाग आता खुले झाल्याने पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकीय प्रवास सुरू करण्यासाठी या उमेदवारांनी कंबर कसली आहे.
[jwplayer rktThdVd]
शिवसेनेच्या अनेक महिला नगरसेविका खुल्या प्रभागांमधूनही निवडणूक लढवतात व निवडून येतात. याच पक्षात माजी नगरसेवकांच्या पत्नी निवडून येण्याची संख्याही जास्त आहे. २०१२ मध्ये अशा प्रकारे सांताक्रूझमधून पूजा महाडेश्वर, सुनयना पोतनीस, चकालामधून स्मिता सावंत, अंधेरी मधील मनिषा पांचाळ, पार्ले येथून शुभदा पाटकर, नायगावमधून अलका डोके महापालिकेच्या सभागृहात दाखल झाल्या होत्या. संजय पोतनीस (माजी नगरसेवक) यांना आमदार होण्याची संधी मिळाली असली, तरी इतर विद्यमान नगरसेविकांचे पती मात्र राजकीय अधिकृत पद मिळण्याच्या संधीसाठी तयार आहेत.
बोरीवली येथे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या रिद्धी खुरसंगे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. या वॉर्डमध्ये आता त्यांचे पती भास्कर खुरसुंगे उभे राहणार असल्याची कुजबुज होती. मात्र त्यांनी ती फेटाळली. ‘मी २००७ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलो. २०१२ मध्ये आरक्षण बदलल्याने पत्नी नगरसेविका झाली. आता ११ क्रमांकाचा वॉर्ड खुला झाला आहे. मात्र यावेळीही तिलाच उभे करणार आहे,’ असे भास्कर खुरसुंगे म्हणाले.
आरक्षणामुळे नगरसेवकपदाची संधी मिळालेले उमेदवार इतर पक्षांमध्येही आहेत. २००७ मध्ये निवडून आलेले मनसेचे परमेश्वर कदम यांच्या वॉर्डचे आरक्षण बदलल्याने त्यांनी २०१२ मध्ये पत्नी, मंगल कदम यांना नगरसेवकपदासाठी उभे केले आणि त्या निवडूनही आल्या. त्या काळात परमेश्वर कदम यांनी मनसेचे विभागाध्यक्षपद सांभाळले. यावेळी वॉर्ड
पुनर्रचनेनंतर १३३ क्रमांकाचा वॉर्ड खुला झाला आहे. पुन्हा नगरसेवकपदासाठी उभे राहता येईल, असे कदम म्हणाले.
माझे पती मनोहर पांचाळ हे दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. २०१२ मध्ये महिला आरक्षण आल्याने मला उभे राहण्याची संधी मिळाली. यावेळी ८० क्रमांकाच वॉर्ड पुन्हा खुला झाल्याने ते निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. मी ही पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक असले तरी इतरांनाही संधी मिळायला हवी. आम्हा दोघांपैकी कोणी एक पदावर असले तरी पुरे आहे.
– मनिषा पांचाळ, नगरसेविका विजयनगर-कोलडोंगरी
गेली ३५ वर्षे मी राजकारणात आहे. २००२ आणि २००७ मध्ये मी अनुक्रमे खार व त्यानंतर सांताक्रूझ येथून निवडून आलो. २०१२ मध्ये महिला आरक्षण आल्याने पत्नीला नगरसेवकपदासाठी उभे केले. आता पुन्हा ८७ क्रमांकाचा वॉर्ड खुला झाल्याने मला राजकीय कारकीर्द सुरू करता येईल.
– विश्वनाथ महाडेश्वर, सांताक्रूझ
[jwplayer 9xR1f6Lm]