‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रात इतिहास घडेल. त्यांनी एकत्र यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असणे पुरेसे नाही, तर त्या दोघांचीही इच्छा असणे आवश्यक आहे,’ असे मत शिवसेनेचे नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शनिवारी व्यक्त केले. युती तुटल्याने शिवसेनेचे नुकसान होणार नाही, असेही जोशी यावेळी म्हणाले.
पुणे येथे एका शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमापूर्वी जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याबाबत विचारले असता जोशी म्हणाले, ‘ दोघांनी एकत्र यावे अशी शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ते दोघे एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल. मात्र, त्यासाठी त्या दोघांची इच्छा असणे महत्त्वाचे आहे. मी याबाबत मध्यस्थी करणार नाही.’
युतीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, ‘एकच ध्येयवाद असलेले पक्ष जेव्हा वेगळे होतात. तेव्हा अर्थातच नुकसान होते. आपल्यालाच सर्वाधिक यश मिळावे यासाठी आता हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे राहतील. मात्र युती तुटल्याने शिवसेनेचे नुकसान होणार नाही. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना सर्वाधिक जागा मिळवेल असा विश्वास आहे.’ युतीत पंचवीस वर्षे सडली या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मताशी मी सहमत आहे, असेही जोशी यांनी सांगितले.
आणखी वाचा – माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात दाखल, उद्धव ठाकरेंकडून प्रकृतीची विचारपूस
कुवत नसलेल्यांना मंत्रिपदे मिळतात
शिक्षणसंस्था आणि कार्यालयांमध्ये देवदेवतांची चित्रे लावण्यासाठी बंदी घालण्याच्या निर्णयावरून झालेल्या गोंधळाच्या संदर्भात शिक्षण विभागाशी संबंधित निर्णय मागे घेण्यात आल्याबाबत जोशी यांना माध्यमांनी छेडले असता ‘निर्णय घेण्याची कुवत नसणारी माणसे मंत्री होत असल्याने निर्णय चुकत आहेत,’ असा टोला जोशी यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला. ते म्हणाले, शिक्षण असणाऱ्याच व्यक्ती मंत्रिपदावर पाहिजेत. निर्णय घेण्याची कुवत नसणारी माणसे मंत्री होत असल्याने निर्णय चुकत आहेत. मंत्रिपद देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि संबंधित पक्षाची असते. सोयीनुसार मंत्रिपदे दिली जातात त्यामुळे असे घडते.’