‘नापास’ होण्याच्या भीतीपोटी आमदार, नगरसेवक भाजपच्या ‘वर्गात’

राज्यातील दहा महापालिकांच्या परीक्षेची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतशी मनसेच्या ‘वर्गा’तून पळून जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मनसेच्या शाळेतून महापालिकेची परीक्षा देणे म्हणजे नापासाचा शिक्का हमखास बसणार या भीतीपोटी ‘राज गुरुजीं’च्या शाळेतून माजी आमदार, नगरसेवक तसेच पदाधिकारी भराभर बाहेर पडून शिवसेना-भाजपच्या शाळेत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी महापालिकेच्या निवडणुकीचा पेपर मनसेसाठी कठीण बनला आहे. पेपर कठीण जाणार असला तरी राज गुरुजी आपली ‘स्टार व्हॅल्यू’ अद्यापि बाळगून आहेत.

मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून मनसेचे विमान चार अंगुळे वरतीच होते. मनसेच्या शाळेत येण्यासाठी तरुणांची कोण धडपड चालली होती. राज गुरुजींच्या प्रचाराच्या सभांपासून पदाधिकाऱ्यांचे मेळावे तुडुंब चालत होते. या साऱ्या काळात राज गुरुजींनी आपला धाक..दरारा..स्टार व्हॅल्यू जी काही निर्माण केली त्याला तोड नव्हती. भल्या भल्या पक्षाच्या नेत्यांना तसेच उद्योजकांना राज यांच्याविषयी आकर्षण निर्माण झाले होते. मनसेची शाळा पाहण्यासाठी आणि राज यांना भेटण्यासाठी भाजपचे नितीनभाऊ गडकरी यांच्यापासून जयंत पाटील यांच्यापर्यंत आणि उद्योगपती अनिल अंबानी यांच्यापासून स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांपर्यंत साऱ्यांनी ‘कृष्णकुंज’ येथे पायधूळ झाडली होती. हृदयनाथ मंगेशकर यांच्यापासून नाटय़ व चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवार मनसेच्या शाळेत डेरेदाखलही झाले होते. २०१२ ची पालिका निवडणूक आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेची शाळा महाराष्ट्रात स्टार बनली होती. खंडीभर नगरसेवक आणि तेरा आमदार निवडून आले. त्यानंतर मात्र इंजिनाची दिशा बदलली. भाजपच्या मोदी गुरुजींच्या लाटेत सारेच आपटले. तेव्हापासून मनसेच्या शाळेची गळती सुरू झाली ती कालपर्यंत. सोमवारीच मुंबईतील मनसेचा तिसरा आमदार भाजपमध्ये डेरेदाखल झाला. यापूर्वी राम कदम यांनी भाजपमध्ये विधानसभेतून प्रवेश केला तर प्रवीण दरेकर मागच्या दरवाजाने विधान परिषदेची शिडी चढले. आता मंगेश सांगळे यांनीही मनसेला रामराम केला असून मुंबईतील २८ पैकी बारा नगरसेवकांनी मनसेची शाळा सोडल्याचे मनसेच्याच शाळेतील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ठाणे, पुणे व नाशिकमध्येही मोठी गळती लागली असून तेरा माजी आमदारांपैकी आता केवळ दोनच जण मनसेत शिल्लक आहेत.

राज हे किल्ला किती लढवणार?

आमदारांची संख्या कमी झाल्याने राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणूक यंत्रणा, प्रचारापासून उमेदवारांपर्यंतची बाजू सांभाळायची कशी, हा प्रश्न निर्माण झाल्याचे मनसेच्याच पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. स्टार प्रचारक राज ठाकरे हेच असणार आहेत हे जरी खरे असले तरी एकटे किती किल्ला लढवणार, हा प्रश्नही कार्यकर्त्यांना सतावत आहे.

Story img Loader