गेली पंचवीस वर्षे मुंबई महापालिके त शिवसेनेसोबत एकोप्याने ‘टक्केवारी’चे राजकारण करणाऱ्या भाजपला निवडणुकीच्या तोंडावर ‘पारदर्शकता’ आठवली असून जनता त्यांना- भाजपला त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशी सणकून टीका मनसेने केली आहे. शिवसेनेच्या गळी पारदर्शकतेचा मुद्दा उतरविण्याचा भाजपचा प्रयत्न हा ‘वाल्या कोळ्या’च्या गोष्टीसारखा असल्याचा टोलाही मनसेने हाणला आहे.
एकीकडे शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. शिवसेनेच्या ‘टक्केवारी’वर व पालिकेतील भ्रष्टाचारावर भाजपकडून टीका केली जात आहे आणि दुसरीकडे जागांसाठी वाटाघाटीही करत आहेत. मतदारांना गृहीत धरून सुरू असलेल्या त्यांच्या राजकारणाचा पराभव निवडणुकीत आम्ही करू, असे आव्हान मनसेचे नेते व माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी दिले आहे.
निवडणुकांसाठी रणनीती आखण्याकरिता मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. ‘‘मनसेने नाशिकमध्ये केलेली कामे पालिका निवडणुकीच्या निमित्ताने लोकांना दाखवली जातीलच, शिवाय मुंबई व ठाण्याच्या विकासासाठी मनसेच्या नेमक्या काय योजना आहेत तेही राज ठाकरे प्रचारादरम्यान स्पष्ट करतील,’’ असेही त्यांनी सांगितले.
गेल्या दोन दशकांच्या सत्तेच्या काळात शिवसेना-भाजपने मिळून मुंबईला केवळ ओरबाडण्याचेच काम केले. गेल्या दहा वर्षांचा जरी विचार केला तरी चाळीस हजार कोटी रुपयांच्या भांडवली कामांचा निधी त्यांनी वापरलेला नाही. पालिकेच्या अर्थसंकल्पाची जोरदार जाहिरातबाजी करणाऱ्या सेना-भाजपने हिंमत असेल या अर्थसंकल्पातील नेमका किती निधी वापरला गेला आणि कितीचा घोटाळा झाला याचीही माहिती लोकांना द्यावी. भाजपचे शेलारमामा आता टक्केवारीचा जाब शिवसेनेला विचारत आहेत. खासदार किरीट सोमय्या माफियागिरी आणि वांद्रय़ाच्या साहेबांच्या पेटय़ांची मोजदाद करत आहेत. त्यांनी शिवसेनेचा भ्रष्टाचार उघड करावाच. तरच त्यांच्या पारदर्शकतेच्या गप्पा मुंबईकर ऐकतील, असेही ते म्हणाले. मनसेचे आज पालिकेत २८ नगरसेवक असून ही संख्या दुप्पट झालेली दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंबईतल पदपथ मुंबईकरांचे राहिलेले नाहीत. सोसायटय़ांमध्ये राहणाऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही की चांगल्या सुविधा हे देऊ शकले. महिलांसाठी मुंबई सुरक्षित राहिलेली नसताना शिवसेनेचे युवराज ‘नाइटलाइफ’ सुरू करण्याच्या बाता मारत आहेत आणि भाजप त्याला विरोध करत आहे. मुंबईत आणि राज्यात सेना-भाजपची सत्ता असताना आरोग्याचे पुरते बारा वाजले आहेत. मुंबईकरांना चांगल्या आरोग्य सुविधा महापालिका देऊ शकत नाही आणि अनधिकृत झोपडय़ा वाढविण्याचे काम भाजपकडून सुरू असताना पारदर्शक कारभाराच्या थापा मारण्याचे काम भाजप नेत्यांकडून जोरात सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.
भाजपची मावळेगिरी..
भाजपकडे चांगल्या कार्यकर्त्यांची वानवा असल्यामुळे वेगवेगळ्या पक्षांतील लोकांना पळवून नेण्याचे काम सुरू आहे. मनसेमधूनही त्यांनी ज्यांना घेतले त्यांच्याविरोधात कालपर्यंत कारवाई करण्याची मागणी भाजपचे नेते करत होते. आता त्यांनाच आमदार केले. भाजपमध्येच यामुळे मोठी नाराजी असून भाजपने गुंडांच्या टोळ्या जमा करण्याचे काम चालवले असून यांनाच मुख्यमंत्री मावळे म्हणत आहेत.
नितीन सरदेसाई