गेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला त्यांच्याच दादरच्या किल्ल्यात धूळ चारणाऱ्या मनसेला महिन्याभरावर आलेल्या निवडणुकांसाठी यावेळी वॉररुमची मदत घेतली आहे. या वॉररूमच्या सहाय्याने राज ठाकरे यांच्या मैदानी भाषणासोबतच सामाजिक माध्यमांवरूनही पक्षाच्या कामगिरीचा प्रचार केला जाईल.
पाच वर्षांपूर्वी मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले होते. दादर- माहीम या भागात तर मनसेने सातही प्रभागांमध्ये विजय मिळवत सेनेला धक्का दिला होता. यावेळी मात्र नगरसेवक व पदाधिकारी दुसऱ्या पक्षात जात असल्याने मनसे गेला महिनाभर चर्चेत आली. दादर येथील विभागाध्यक्ष प्रकाश पाटणकर यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यातच कोणत्याही पक्षाशी युती केला जाणार नसून सर्व २२७ जागा लढवणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. या सर्व पाश्र्वभूमीवर गेल्या निवडणुकांपेक्षा यावेळची लढाई कठीण असल्याने मनसेने विविध पातळ्यांवर प्रचाराला सुरूवात केली आहे. किमान दादर येथील सर्व जागा स्वतकडे ठेवण्यासाठी मनसेचा प्रयत्न राहणार आहे.
मनसेचे पालिकेतील गटनेता संदीप देशपांडे यांनी ही वॉररूमची कल्पना मांडली व प्रत्यक्षात आणली. तरुण मुलांचा राज ठाकरे यांना पाठिंबा आहे आणि सामाजिक माध्यमांमधून त्यांच्याशी जोडणे सोपे होईल, असे मनसेला वाटते. वॉर रूमचे काम पाहण्यासाठी ६० कार्यकर्त्यांना नेमण्यात आले आहे.