राज्य सरकारमध्ये मानापमानावरून एकमेकांविरोधात ‘टीकासूर’ लावणाऱ्या सत्ताधारी भाजप-शिवसेना यांच्यात मुंबई महापालिका निवडणुकीत युती होईल की नाही, अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. असे असतानाच युतीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला ‘अल्टिमेटम’ दिला आहे. मुंबई महापालिका निवडणूक होण्याआधी युतीचा निर्णय घ्या, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज्यात सत्तेत मांडीला मांडी लावून बसल्यापासून भाजप -शिवसेनेत ‘पायात-पाय’ घालण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. एखाद्या मुद्द्यावरून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोन्ही पक्षांतील नेते सोडत नाहीत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत तर युती होईल की नाही, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात दोन्ही पक्षांतील काही नेते स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे शिवसेनेने सर्व प्रभागांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याचे समजते. वरिष्ठ पातळीवरून जातीने त्यात लक्ष घातले जात आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप हा अव्वल स्थानी असल्याचे निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले आहे. पण मुंबई आणि इतर महापालिका निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढणे जोखमीचे असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत असल्याची चर्चा आहे. तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीसाठी आग्रही आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात येते. दरम्यान, दोन्ही पक्षांच्या वतीने पहिली टाळी कोण देणार हे अद्याप निश्चित नाही.
भाजपकडूनही युतीबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचे बोलले जाते. युतीबाबतचा पेच सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीबाबतचा निर्णय निवडणुकांच्या आधी घ्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपला केला आहे. पुढील दोन दिवसांत महापालिका निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर युतीबाबतचा निर्णय घ्यावा, असे सांगून ठाकरे यांनी भाजपला ‘अल्टिमेटम’ दिला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला भाजपकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीत युतीसाठी पहिली ‘टाळी’ कोण देतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.