‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’ म्हणत महापालिका निवडणुकीत युती अथवा आघाडी न करण्याची भूमिका घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी मात्र प्रस्ताव आल्यास युतीचा विचार करू, असे म्हणत आपल्या जुन्या भूमिकेत बदल केला आहे.

मुंबई, ठाणे, पुणे व नाशिकसह राज्यात दहा महापालिकांच्या निवडणुका होत आहेत.  शिवसेना-भजपची युती होण्याची शक्यता धुसर असताना ‘प्रस्ताव आल्यास युतीचा विचार करू’ असे सांगत आपला ‘राज’कीय पत्ता मनसेने खुला केला आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्यावेळी नरेंद्र मोदींचे गुणगान करणाऱ्या राज यांनी त्यानंतर मोदींवर टीका करण्यास सुरुवात केली. निश्चलनीकरणाच्या पाश्र्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची संधी त्यांनी सोडली नाही. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बुलेट ट्रेनच्या मुद्दय़ावरून मुंबई तोडण्याचा डाव असल्याची टीकाही त्यांनी केली. राज यांच्या या टीकेचा समाचार घेताना गेली तीन दशके मुंबई महापालिकेच्या तोंडावर मुंबई तोडण्याचा डाव असल्याची हाकाटी शिवसेना मारत असून आता ‘पुतण्या’नेही तीच बोंब ठोकल्याची टीका भाजप मुंबईचे अध्यक्ष व आमदार आशीष शेलार यांनी केली आहे. तसेच मनसेबरोबर युतीची शक्यताही शेलार यांनी यापूर्वीच ठाम फेटाळून लावल्यामुळे राज ठाकरे आता कोणाला ‘डोळा मारत आहेत हे त्यांनाच माहीत, असा टोला भाजपच्या एका नेत्याने लगावला.

मुंबई, ठाणे, पुणे व नाशिकमध्ये मनसेच्या अनेक नगरसेवकांनी व नेत्यांनी राज ठाकरे यांना रामराम ठोकत शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. ठाण्यामध्ये तर मनसेकडे एकही नगरसेवक शिल्लक राहिलेला नाही. अशावेळी भरकटलेल्या इंजिनाला आपले ‘डब्बे’ जोडायला कोणता पक्ष तयार होणार, असा सवालही या नेत्याने केला.

काही वर्षांपूर्वी मनसे जोरात असताना शिवसेनेने ‘सामना’मधून प्रस्तावात्मक भूमिका मांडली होती त्यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेताना ‘असे वर्तमानपत्रातून युतीचे प्रस्ताव कोणी मांडत नाहीत’ असे सांगितले होते. आता परिस्थिती बदलली आहे. जरी भाजपशी आमची युती होऊ शकली नाही, तरी मनसेला बरोबर घेणे सेनेला परवडणारे नसल्याचे सेनेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. दुसरे म्हणजे प्रस्ताव घेऊ न मनसेकडे जावे अशी त्या पक्षाची स्थिती आज नाही, हवे तर त्यांनी प्रस्ताव घेऊन फिरावे, असा टोलाही या नेत्याने लगावला.