कमळ चिन्ह घेण्यास आठवलेंचा नकार

महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये महायुती झाली तरी, भाजपकडून रिपब्लिकन पक्षाच्या तगडय़ा कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन त्यांना रिपाइंच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास भाग पाडले जाण्याचा धोका पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे भाजपबरोबर युती झाली तरी, त्यांचे कमळ चिन्ह घेण्यास पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नकार दिला आहे. कमळ चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या कार्यकर्त्यांला बडतर्फ करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

निवडणुका भाजप, शिवसेना व रिपाइंने एकत्र येऊन महायुती म्हणून लढवाव्यात अशी भूमिका आठवले यांनी मांडली आहे. या निवडणुकांमधील पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी लोणावळा येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.  भाजप-शिवसेना एकत्र आले नाही, तरी भाजपबरोबर युती करून निवडणुका लढविण्याबाबत चर्चा झाली.

महायुतीत रिपब्लिकन पक्षाला काही जागा सोडल्या जातात, परंतु त्याच जागांवर रिपाइंच्या ताकदवान कार्यकर्त्यांना भाजपकडून उमेदवारी देऊन पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढविण्यास भाग पाडले जाते. या पूर्वी नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये तसे प्रकार घडले आहेत. भाजपबरोबर युती करण्याबाबत रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मंगळवारी चर्चा केली.