* भाजप नेते पोहोचण्यापूर्वीच रुग्णालयाचे भूमिपूजन * तासाभरात दुसऱ्यांदा कार्यक्रम
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपापली कामे दाखवण्यासाठी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार चढाओढ सुरू असून मंगळवारी शताब्दी रुग्णालयाच्या नामकरण आणि नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यातून त्याचे दर्शन घडले. खासदार गोपाळ शेट्टी व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत रुग्णालयाचा नामकरण व भूमिपूजन सोहळा पार पाडण्याचे भाजपचे बेत असतानाच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आधीच कार्यक्रम स्थळी जाऊन आपला ‘कार्यभाग’ साधला. सेनेच्या या ‘गनिमी काव्या’ने भाजपच्या गोटात काही काळ गोंधळ उडाला. परंतु, तरीही भाजपने ठरवलेला कार्यक्रम उरकला. त्यामुळे एकाच प्रकल्पाचे तासाभराच्या अंतरात दोनदा भूमिपूजन झाले.
बोरिवली येथील कस्तुरबा क्रॉस रोड नं. २ येथील शताब्दी रुग्णालयाचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय असे नामकरण करण्याचा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजूर झाला आहे. तसेच या रुग्णालयाच्या आवारात ११ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. रुग्णालयाचे नामकरण आणि नव्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आल्याचे फलक रुग्णालय परिसरात भाजपतर्फे झळकविण्यात आले होते. खासदार गोपाळ शेट्टी, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार मनीषा चौधरी यांच्या हस्ते नामकरण व भूमिपूजन करण्यात येणार होते.
पालिकेमध्ये सत्तेत सहभागी असताना घोटाळ्यांची जबाबदारी झटकणाऱ्या भाजपकडून विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना शिवसेनेने सुरुंग लावला. ३ जानेवारी सकाळी ९ वाजता शिवसेनेचे विभागप्रमुख प्रकाश कारकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शताब्दी रुग्णालयाचे नामकरण व इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी प्रभाग समितीच्या अध्यक्षा शीतल म्हात्रे, आमदार प्रकाश सुर्वे, नगरसेविका आसावरी पाटील, प्रभारी विभागप्रमुख विलास पोतनीस, नगरसेवक उदेश पाटेकर आदी उपस्थित होते. ‘शिवसेना झिंदाबाद’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी रुग्णालय परिसर दणाणून टाकला. भाजपचे कार्यकर्ते जमण्यापूर्वीच सकाळी ९ वाजता इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. शिवसैनिकांनी अचानक पार पाडलेल्या कार्यक्रमामुळे भाजपच्या गोटात गोंधळ उडाला.
कार्यक्रम उरकून शिवसैनिक निघून गेले आणि त्यानंतर भाजपचे नेते रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते भूमिपूजन व नामकरण कार्यक्रम उरकून घेतला. यावेळी भाजपच्या आमदार मनीषा चौधरीही उपस्थित होत्या. पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये विकासकामांचे श्रेय लाटण्यावरून चुरस लागली असून युतीबाबतचा निर्णय लागण्यापूर्वीच शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांसमोर ठाकू लागले आहेत.