आगामी महापालिका निवडणुकांसाठी युतीबाबत भाजपने सकारात्मक भूमिका घेतल्याचे भाजप नेत्यांनी सांगितल्यानंतर मीही युतीबाबत कधीच नकारात्मक नव्हतो, असे स्पष्ट करीत युतीचा अंतिम निर्णय मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. युतीबाबत आजपासून चर्चेची शक्यता आहे, असेही त्यांनी संकेत दिले.
आगामी महापालिका निवडणुकांकडे मिनी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. प्रत्येक पक्षाने या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. युतीबाबत पहिली टाळी कोण देणार, याबाबत सध्या जोरदार खल सुरू आहे. त्याचवेळी युतीचा प्रस्ताव आल्यास आपण युती करण्यात तयार आहोत, असे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर युतीबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, असे उद्धव ठाकरे यांनी काल, मंगळवारी सांगितले होते. त्यावर आज, भाजपचे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपण युतीबाबत नेहमीच सकारात्मक होतो, असे स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांनीही आपण युती करण्याबाबत कधीच नकारात्मक नव्हतो, असे स्पष्ट करून युतीच्या चर्चेबाबत एक पाऊल पुढे असल्याचे संकेत दिले आहेत. शिवसेना आणि भाजप युतीबाबत अंतिम निर्णय मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच आजपासून चर्चेची शक्यता असून, शिवसेनेकडून तीन आणि भाजपकडून तीन वरिष्ठ नेते चर्चा करू शकतात, असे समजते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर भाजपच्या बैठकीत युतीबाबत सकारात्मक असल्याचे संकेत नेत्यांनी दिले आहेत. या बैठकीला आशिष शेलार, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. युतीबाबत भाजपने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यादृष्टीने चर्चेसाठी शिवसेनेला निमंत्रण देऊ, असे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. युतीची चर्चा ही लवकर व्हावी, त्यासाठी शिवसेनेला निमंत्रण देण्याची भूमिका भाजपने घेतली आहे, असेही शेलार यांनी सांगितले आहे. चर्चेबाबत लवकरच भाजपकडून अधिकृत माहिती दिली जाणार आहे. या चर्चेदरम्यान, जागावाटपाचा महत्त्वाचा मुद्दा मुख्य अजेंड्यावर असेल, असेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.