भाजपपाठोपाठ सेना, मनसेलाही पालिकेची परवानगी
निवडणुकीतील पराभवाचा ‘बदला’ म्हणून निकाल होताच शिवाजी पार्क येथील ‘सेल्फी पॉइंट’ हटवून टाकणाऱ्या मनसेला आणि या भागातील निवडणूक जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या शिवसेनेला पिछाडीवर टाकत भाजपने या ठिकाणी सेल्फी पॉइंट उभारण्याची परवानगी मिळवली. त्यामुळे चवताळून उठलेल्या सेना, मनसेनेही पालिकेकडे आग्रह धरल्याने अखेर ५० फूट अंतरावर तिन्ही पक्षांना आपापले सेल्फी पॉइंट उभारण्याची परवानगी पालिका अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे येत्या काळात शिवाजी पार्कभोवती रपेट मारणाऱ्यांना या सेल्फी पॉइंटनाही प्रदक्षिणा घातल्याचा ‘आनंद’ मिळणार आहे.
मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्या कल्पक बुद्धीतून शिवाजी पार्क येथे उभा राहिलेला शहरातील पहिला सेल्फी पॉइंट तरुणांमध्ये प्रसिद्ध झाला. मात्र पत्नी स्वप्ना यांचा शिवाजी पार्क प्रभागात पराभव झाल्याचे जिव्हारी लागल्यावर संदीप देशपांडे यांनी रागाने हा सेल्फी पॉइंट काढून टाकला. या सेल्फी पॉइंटच्या देखभालीचा खर्च परवडणार नसल्याचे कारण त्यांनी पुढे केले. राजकारणात सर्वसामान्य जनतेवर राग काढण्याची किंमत किती असते याचा मनसेला लगेच अनुभव आला. सेल्फी पॉइंट बंद झाल्याची बातमी वेगाने पसरली. भाजपने विद्युतवेगाने हालचाली करून गुरुवारी सकाळी वॉर्ड अधिकाऱ्यांकडून सेल्फीसाठी अधिकृत जागा मिळवली. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी ट्वीटवरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली. तब्बल पाच वर्षांच्या वनवासानंतर दादरचा किल्ला पुन्हा ताब्यात घेणाऱ्या सेनेनेही लगबग करून स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत यांचे छायाचित्र असलेला फलक लावून सेल्फी पॉइंट उभारणार असल्याचे जाहीर केले. झालेली चूक निस्तरण्यासाठी मनसेनेही सेल्फी पॉइंट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र बाणातून सुटलेल्या तीराची किंमत मनसेला मोजावी लागली.
पालिका अधिकाऱ्यांकडून गुरुवारी अवघ्या दोन तासांत भाजपला सेल्फी पॉइंटची परवानगी दिली गेल्यावर सेना व मनसेकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. पक्षपातीपणाचा आरोप होऊ नये यासाठी जी उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांच्याकडे शुक्रवारी सकाळी ११ वाजता बैठक बोलावण्यात आली व तिथे सर्वच पक्षांना ५० फूट अंतरावर सेल्फी पॉइंट उभारण्याची परवानगी दिली गेली. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात लवकरच एकाऐवजी तीन-तीन सेल्फी पॉइंटचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे.