उद्धव ठाकरे यांचे भाजपाला आव्हान; लाचार होऊन युती करणार नसल्याची स्पष्टोक्ती

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोटाबंदीनंतर लोक जिवंत आहेत, हेच का ‘अच्छे दिन’ म्हणायचे, असा थेट हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चढवत, ‘जनतेला भूलथापा देऊन भाजप सत्तेचे इमले बांधत आहे, ’ असे टीकास्त्र  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडले. दगाबाजी करुन अन्य पक्षांशी युती करण्याची आमची नियत नाही, हिंमत असेल तर समोरासमोर लढा, असे आव्हानही ठाकरे यांनी भाजपला दिले. स्वबळावर लढण्यासाठी शिवसेनेने पूर्ण तयारी केली असल्याचे संकेतच उद्धव ठाकरे यांनी दिल्याने, वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्याचे वारे सळसळू लागले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून जनतेला भुलविणाऱ्या घोषणा केल्या जात असून विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला मांडला जाणार आहे, राष्ट्रपतींनी केंद्र सरकारला त्यापासून रोखावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना लाचार होऊन युती करणार नसल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि सत्तेतील भागीदार पक्ष असलेल्या भाजपवर अक्षरश अग्निबाणांचा मारा केला. नोटाबंदी, सामान्य माणसाचे हाल, शेतकऱ्याची दैना आणि सरकारची बेफिकीरी या मुद्दय़ांवर सरकारला त्यांनी धारेवर धरले.  ठाकरे म्हणाले, या निर्णयामुळे लोक मेटाकुटीला आले आहेत. ते जिवंत आहेत, इतकेच. पण यालाच तुम्ही अच्छे दिन म्हणणार का.  जनतेचा नोटाबंदीला पाठिंबा दिला जात असल्याचे भासवले जात असले तरी वस्तुस्थिती तशी नाही, असे सांगत, मोदी यांनी जाहीर केलेल्या योजनांचीही ठाकरे यांनी खिल्ली उडविली. योजना जुन्याच असून ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला,’ असा टोला ठाकरे यांनी लगावला. निवडणुकांवर डोळा ठेवून जनतेवर आश्वासनांची खैरात करायची आणि थापेबाजी करुन सत्ता मिळवायची, ही भाजपची चाल आहे. त्यासाठीच केंद्रीय अर्थसंकल्पही एक फेब्रुवारीला मांडला जाणार असून त्यास राष्ट्रपतींनी मनाई करावी, अशी विनंती शिवसेनेच्या खासदारांकडूनही केली जाईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन झाले व त्याला स्थगिती देण्याची वेळ आली. प्रसिध्दी व निवडणुकीतील फायद्यासाठी घाईघाईने बुलेट ट्रेनचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळापुढे आणला व शिवसेनेने तो रोखला. आमचा विकासाला विरोध नाही, पण आधी आराखडा नीट करा व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा, असे ठाकरे यांनी सुनावले.

..तर सेना पेटून उठेल

हिंदूत्वाविरोधात भूमिका घेतल्यास शिवसेना पेटून उठेल, असे ठणकावत ठाकरे यांनी राममंदिर बांधले जात नसल्याबद्दल भाजपची खिल्ली उडविली. हिंदूू पुरोहितांवर प्राप्तीकर विभागाच्या धाडी पडत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत अन्य धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवरही िहमत असेल तर धाडी टाकून इथेही सर्वधर्मसमभाव दाखवा, असा टोलाही ठाकरे यांनी हाणला. राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये ऐनवेळी भाजप शिवसेना युती झाल्याचा संदर्भ देत ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. शिवसेनेने केवळ भाजपशी युती केली, मात्र भाजपने स्थानिक पातळ्यांवर अनेक पक्षांशी युती केली आणि सत्ता मिळविली. आम्ही कपट कारस्थान करीत नाही, समोरासमोर लढतो, असे ठणकावत ठाकरे यांनी भाजपला आव्हान दिले.

  • आम्ही एक दिवस महाराष्ट्र बंद केला तर दंड भरावा लागतो, मग नोटाबंदीच्या निर्णयाने झालेल्या नुकसानाची भरपाई कोण देणार?
  • विजय मल्ल्या पळून गेला, तेव्हा झोपा काढत होता का?
  • शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या व शेतीमालाला योग्य भाव द्या
  • निवडणूक स्वच्छपणे लढवा, मत विकत घेण्यासाठी आमच्याकडे तेवढी ‘लक्ष्मी’ नाही, आणि आम्ही पैशाचे राजकारण करतही नाही..

मोदी सरकारची ब्रिटीश राजवटीशी तुलना

देशात चुकीच्या दिशेने कारभार सुरु असल्याने ते बघवत नसल्याने शिवसेना विरोधात बोलत आहे. दुष्काळ संपला तरी आता तेरावा महिना सुरु झाला आहे, अशी टिप्पणी करीत ठाकरे यांनी मोदींच्या कारभाराची तुलना ब्रिटीश राजवटीशी केली. इंग्रजांनीही विकास केला, मग त्यांना देशातून का हाकलले, असा सवाल केला.

मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray comment on bjp