ओबीसी आक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्याने आता महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबई पालिका निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. असं असलं तरी राज्यातील सत्ताबदलांचा परिणाम पालिका निवडणुकीवर नक्कीच होणार आहे. सत्ता बदलामुळे पुन्हा एकदा नव्याने वॉर्ड रचना होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.
तरीही एक ऑगस्टला सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं याकडे राज्यातील राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहे. जर शिंदे-फडणवीस सरकार कायम राहीलं तर पुन्हा एकदा वॉर्ड रचनेत बदल होण्याची शक्यता नाकारली जात नाही. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वॉर्ड रचनेमध्ये मुंबई पालिकेतील वॉर्डची संख्या वाढवत २२७ वरुन २३६ वर गेली होती, ९ वॉर्ड हे वाढले होते. यामुळे अनेक वॉर्डच्या सीमांमध्येही बदल करण्यात आल्या होत्या. हे सर्व करतांना शिवसेनेला सोयीची होईल अशी रचना ठेवण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला होता.
आता तर भाजपा सत्तेत कायम राहिला तर पुन्हा एकदा वॉर्ड रचनेत बदल करत भाजपाच्या सोईनुसार वॉर्ड रचनेच बदल केले जातील अशी चर्चा आत्ताच सुरु झाली आहे. त्यामुळे मुंबईतील नगरसेवकांचे खास करुन भाजपा-शिवसेनेमधील आणि आता शिंदे गटाकडे जाऊ इच्छिणाऱ्या नगरसेवकांचे वॉर्ड रचनेवर बारीक लक्ष असणार आहे. तेव्हा पुढील काही दिवसांतील घडामोडी या मुंबई पालिका निवडणुकीत कोणाची सत्ता आणणार याचे संकेतच देण्याची शक्यता आहे.