मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यावर तात्काळ पालिकेतील तीन अधिकाऱ्यांची बदली झाल्यामुळे आता पालिकेतील अधिकारी धास्तावले आहेत. पालिकेतील सहाय्यक आयुक्तांपासून ते अतिरिक्त आयुक्तांपर्यंत सगळय़ांमध्येच बदलीच्या भीतीचे वातावरण आहे.
राज्यात सत्तांतर होताच सोमवारी पालिकेतील तीन सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटचे मानले जाणारे किरण दीघावकर यांची दादर, धारावीतून भायखळय़ामध्ये बदली करण्यात आली. यामागे राजकीय नेत्याचा हात असल्याची चर्चा आहे. या बदल्यांनंतर आता अन्य काही सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचीही चर्चा पालिकेत आहे. लवकरच आणखी काही सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या होतील अशी अटकळ बांधली जात आहे . मुंबईतील बंडखोर आमदारांचे काही पालिका अधिकाऱ्यांशी पटत नव्हते. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी आमदारांनी तगादा लावला होता, असे समजते. आता सत्तांतर झाल्यामुळे असे सर्व अधिकारी सध्या चिंतेत आहे.
पालिकेतील अधिकाऱ्यांबरोबरच वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येही बदलीची भीती निर्माण झाली. अतिरिक्त आयुक्तांमध्ये आता कोणाची बदली कुठे होणार याबाबत दबक्या आवाजात चर्चा रंगू लागल्या आहेत. पालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना नवीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आता आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची वर्णी लावतील का किंवा पालिकेतून कोणाची अन्यत्र बदली होईल का याच्या चर्चा रंगल्या आहेत.