एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा सर्वात मोठा परिणाम हा मुंबईत होणार आहे. शिवसेनेचा एक खासदार राहुल शेवाळे शिंदे गटाकडे, एक अरविंद सावंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आणि गजनान किर्तीकर यांनी भुमिका स्पष्ट केली नसली तरी मध्यतंरी एकनाथ शिंदे यांनी कीर्तीकरांची भेट घेतली असल्याने ते शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा आहे.
तर निवडुन आलेल्यांपैकी एकनाथ शिंदे यांच्या बाजुने मुंबईतील प्रकाश फातर्पेकर, यामिनी जाधव, सदा सरणवकर, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, प्रकाश सुर्वे या आमदारांनी उघड पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेबरोबर – आदित्य ठाकरे यांच्याबरोबर अजय चौधरी, संजय पोतनीस, रविंद्र वायकर, सुनील प्रभू, सुनील राऊत, रमेश कोरेगाकर हे आमदार उभे ठाकले आहेत.
शिवसेनेतील बंडाला एक महिना उलटला असतांना शीतल म्हात्रे सारखे काही मोजके नगरसेवक हे उघडपणे शिंदे गटात दाखल झाले आहेत. तर काही नगरसेवक हे शिवसेनेबरोबर राहीले आहेत. असं असलं तरी अनेक नगरसेवकांनी आपली भुमिका उघडपणे जाहीर केलेली नाही.
त्यातच आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विविध शिवसेना शाखांना भेटी देत एक दौरा पूर्ण केला आहे. या दौऱ्यांना चांगला प्रतिसादही मिळाला आहे. तेव्हा निवडुन आलेले काही प्रमुख लोकप्रतिनिधी शिंदे गटाबरोबर आणि काही आमदार आणि शिवसनेचे पदाधिकारी, शाखा प्रमुख हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असं सर्वसाधारण चित्र मुंबईत आहे.
शिंदे-फडणवीस सरकार हे रहाणार की नाही हे आता एक ऑगस्टच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. केंद्रीय निवडणुक आयोगानेही कार्यवाही सुरू करत दोन्ही गटांना शिवसेनेवरील दाव्याबाबत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
साधारणतः प्रत्येक नगरसेवक हा कोणत्या ना कोणत्या आमदार किंवा खासदरांशी जोडला गेलेला असतो. आमदार आणि खासदार यांनी उघड भुमिका जरी घेतली असली तरी मुंबईतील शिवसेनेचे काही नगरसेवक हे काठावर आहे, अनेकजण द्वीधामनस्थितीत आहेत की नेमकं कोणाबरोबर जायचे ते. तेव्हा काही दिवसानंतरच मुंबई महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांचा कल कोणाकडे आहे याचे चित्र स्पष्ट होणार आहे.