उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातील विलेपार्ले, सांताक्रूज, वांद्रे या भागात मनसेचा प्रभाव दखलपात्र आहे. गेल्या महानगरपालिका निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता काही महत्वाच्या वॉर्डमध्ये मनसे ‘डॅमेज मेकिंग फॅक्टर’ ठरण्याची शक्यता आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांनी कौटुंबिक अडचणींमुळे जास्त प्रचार सभा घेतल्या नव्हत्या. तरीसुद्धा अनेक मतदार संघात मनसेने चांगली मते मिळवली होती. यात उल्लेख करावा लागेल तो वॉर्ड नंबर ९७ चा. या मतदार संघात मनसेने सहा हजार पेक्षाही जास्त मते मिळवली होती. खासदार पूनम महाजन यांच्या जनसंपर्कावर काय प्रश्नचिन्ह केले जाते. त्या लोकांना भेटत नाहीत अशी त्यांच्याविषयी लोकांची तक्रार असते.
या भागात कोविड काळात मनसेने स्थानिक पातळीवर खूप मोठ्या लोकांना मदत केली होती. त्यामुळे मनसेचे पदाधिकारी विलेपार्ले, सांताक्रूज, वांद्रे या भागात घराघरात पोचले होते. वांद्रे पश्चिम हा आशिष शेलार यांचा मतदार संघ आहे. आशिष शेलार, पराग आळवणी यांचा जनसंपर्क दांडगा आहे. या भागात खासदारांविषयी नाराजी असली तरी भाजपाच्या काही नेत्यांनी बाजू सांभाळून धरली आहे. शिवसेनेला धक्का देण्यासाठी या भागात भाजपाकडून मनसेचा छुपा वापर केला जाऊ शकतो. ज्या वॉर्मध्ये मनसेची ताकद वाढली आहे त्या ठिकाणी भाजपा मनसेला ताकद देण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन भाजपाला फायदा होऊ शकतो.