प्रभाग क्रमांक ९६ हा वांद्रे पूर्व भागात पसरलेला मोठा वॉर्ड आहे. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने हाजी मोहम्मद खान यांना उमेदवारी दिली होती. हा वॉर्ड मुस्लिम बहुल असून उत्तर भारतीय मतदारसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात आहेत. असं असूनसुध्दा या वॉर्डमध्ये शिवसेनचा नगरसेवक आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे शिवसेनेचे दिवंगत आमदार बाळा सावंत यांनी केलेली विधानसभा मतदार संघाची बांधणी. मुस्लिम मतदार ही शिवसेनेची पारंपरिक वोट बँक नसूनसुद्धा बाळा सावंत यांनी सर्वाना एकत्र आणलं होतं. आणि त्यामुळेच त्यांना याभागातून मोठा जनाधार मिळत होता.
२०१७ च्या निवडणुकीत एकूण १५ उमेदवार होते त्यापैकी ७ उमेदवार हे अपक्ष होते. या निवडणुकीत बाजी मारली ती हाजी मोहम्मद खान यांनी. त्यांना काँग्रेसच्या उमेदवाराने टक्कर दिली होती. २०२२ च्या निवडणुकीत समीकरणे वेगळी आहेत. शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्र निवडणूक लढवल्यास या मतदारसंघात शिवसेनेची टक्कर ही भाजपासोबत असेल. कट्टर हिंदुत्ववादी पक्ष अशी प्रतिमा असणाऱ्या शिवसेनेला या भागात निवडून यायचं तर मुस्लिम चेहरा असणे आवश्यक आहे. हाजी मोहम्मद खान यांच्या रूपाने वॉर्ड क्रमांक ९६मध्ये शिवसेनेला मुस्लिम चेहरा मिळाला आहे.