उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात महानगरपालिका निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर या भागातील महापालिका निवडणुकीची समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. मुंबई शिवसेनेत बंडाची पहिली ठिणगी पडली ती याच मतदार संघात. मागाठणे मतदार संघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी एकनाथ शिंदे यांचा हात धरला.
प्रकाश सुर्वे यांची या भागात मोठी ताकद आहे. मागाठणे, चारकोप,गोराई आणि कांदिवली या भागात प्रकाश सुर्वे गटातील नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हे सर्व माजी नगरसेवक प्रकाश सुर्वे यांच्यासोबत शिंदे गटात सामील झाले तर या भागातील महापालिका मतदार संघात शिवसेनेची पाटी कोरी होण्याची शक्यता आहे. उत्तर मुंबईत शिवसेनेला दुसरा मोठा धक्का बसला तो बोरीवलीमध्ये. प्रकाश सुर्वे यांच्यानंतर बोरिवलीच्या शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यासुद्धा शिंदे गटात सामील झाल्या. शीतल म्हात्रे यांची लोकांमध्ये जाऊन काम करणारी नगरसेविका अशी प्रतिमा आहे. हा मतदारसंघ शिवसेनेच्या हमखास निवडून येणाऱ्या जागांपैकी एक होता. मात्र यात शीतल म्हात्रे यांची वैयक्तिक ताकद आणि दांडगा जनसंपर्क या जमेच्या बाजू होत्या. त्यामुळे या जागेवरसुध्दा शिवसेनेला आता पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.
यासोबतच शिवसेनेतील पक्षांतर्गत गटबाजीसुद्धा मोठी आहे. एकंदरीतच शिवसेनेची बऱ्यापैकी ताकद असणाऱ्या भागात बंडखोरीमुळे समीकरणे बदलणार आहेत. प्रकाश सुर्वे राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आले तेव्हा त्यांच्यासोबत याभागातील अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यापैकी काही नेते २०१७ च्या निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे प्रकाश सुर्वे यांच्या शिंदे गटात जाण्यामुळे शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे.