जुना उत्तर मुंबई मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला मनाला जात होता. मात्र अभिनेता गोविंदा त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघात काँग्रेसने पाय रोवले. या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतरसुद्धा संजय निरुपम यांनी निवडून येत उत्तर मुंबईत कॉंग्रेसचा झेंडा फडकवत ठेवला. निरुपम यांनी उत्तर मुंबईत पक्षाची मजबूत रचना करण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे या मतदार संघात गुजराती मतदार मोठ्या प्रमाणत आहेत त्याचप्रमाणे मालाड आणि मालवणी या पट्ट्यात उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहे. मालवणी विधानसभेचे आमदार अस्लम शेख यांनी याभागात काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे.
२०१४ च्या मोदी लाटेत या मतदार संघात काँग्रेसचा धुरळा उडाला. याचा परिणाम येथील महानगर पालिकेच्या मतदार संघावरसुद्धा झाला. बोरिवली, कांदिवली या भागात काँग्रेसचे अस्तित्व कमी झाले. सध्या मालवणीतील लोकांनीच कॉंग्रेसला हात दिला आहे. महानगर पालिका निवडणूक तोंडावर आल्या असताना देखील संजय निरूपम मतदारसंघात फारसे फिरकत नाहीत. त्यामुळे ज्या भागात काँग्रेसचे अस्तित्व होते त्या भागातसुद्धा काँग्रेसची ताकद कमी होऊ लागली आहे. पक्षाला याचा फटका येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. महानगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या वाढत्या वर्चस्वाला आव्हान देणाची ताकद शिवसेनेत होती. मात्र बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात मोठी फूट पडली आणि भाजपाचा मार्ग मोकळा झाला.