उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाला सर्वपक्षीय घराणेशाहीची परंपरा आहे. येथील बहुतांश महापालिका मतदारसंघात आरक्षणामुळे समीकरणे बदलली आहेत. मात्र तरीसुद्धा येथील नेत्यांच्या घरातीलच व्यक्ती महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर राजकारणात सक्रिय आहेत.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत आमदार सुनील प्रभू त्यांचा मुलगा अंकित प्रभू याला निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. माजी नगरसेविका सुधा टेंबवलकर यांचे चिरंजीव विद्यमान नगरसेवक आहेत तर त्यांच्या सुनबाई माजी नगरसेविका. याच मतदार संघातून आशिष शेलार यांचे भाऊ निवडणूक लढवतात. विद्या ठाकूर यांचे चिरंजीव दीपक ठाकूर हे वॉर्ड क्रमांक ५० नगरसेवक आहेत. यंदा हा वॉर्ड महिला आरक्षित झाल्यामुळे त्यांच्या पत्नीला तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईचे माजी उप-महापौर दिलीप पटेल यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवल्यानंतर दिलीप पटेल यांच्या मुलाला प्रभाग क्रमांक ५८ मधून उमेदवारी दिली. आता संदीप पटेल यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्यामुळे ते त्यांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत.
ही झाली काही प्रमुख उदाहरणे. या सोबतच अनेक वॉर्ड आहेत जिथे प्रस्थापित नेत्याच्या घरातील व्यक्ती येणाऱ्या महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार असा प्रश्न विचारला जातोय.