ईशान्य मुंबईत लोकसभा मतदारसंघात विक्रोळी आणि भांडूप पश्चिम या विधानसभा मतदारसंघात मराठी भाषित बहुसंख्य, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, मुलुंड या मतदार संघात गुजराती भाषिक बहुसंख्य तर मानखुर्द-शिवाजीनगर भागात मुस्लिम-मिश्र भाषिक अशी ढोबळ भाषिक विभागणी झाली आहे. त्यामुळे गुजराती भाषिक भागात भाजपा सातत्याने निवडून येत आहे, तर मराठी भाषिक भाग असलेल्या विक्रोळी ते भांडूप या पट्ट्यात शिवसेनेचे वर्चस्व राहीलेले आहे. विशेषतः विक्रोळी पूर्व,कांजूर पूर्व आणि भांडुप पूर्व याभागात मराठी बहुल तेही मुळचे कोकणातले किंवा कोकणाशी संबंधित असलेले रहिवासी हे मोठ्या प्रमाणात चाळींमध्ये स्थायीक झालेले आहेत.
या मराठी भाषिक भागात शिवसेनेचा सुरुवातीपासून चांगला जनसंपर्क राहीला आहे,शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदार बांधून ठेवले आहेत. पारंपरिकरीत्या शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघात मनसेच्या उदयानंतर काही काळ शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का बसला होता. मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच महापालिका निवडणुकीत मंगेश सांगळेसारखे नेते मराठी मते मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडून खेचत नगरसेवक म्हणून विजयी झाले, त्यानंतर ते आमदारही झाले. मात्र त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शिवसेनेने मनेसेचा करिष्मा उतरताच पुन्हा एकदा या भागातील मराठी मतदार स्वतःकडे वळवण्यात यश मिळवले. याचा फायदा विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला चांगला झाला.
ईशान्य मुंबईतील मराठी भाषिक भागात असलेले वॉर्ड आता चांगल्या संख्येने शिवसेनेकडे सध्या आहेत. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमध्ये या भागातील शिवसेनेचे दोनही आमदार सुनील राऊत आणि रमेश कोरेगाकर हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर पक्षसंघटना आणि नगरसेवक असल्याचं चित्र सध्या आहे. तेव्हा शिंदे यांच्या बंडाचा फारसा परिणाम या भागात होणार नाही असं म्हटलं जात आहे, असं असलं तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी या लोकसभा मतदारसंघात शिवेसेनेचे बालेकिल्ले कायम रहतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं असेल.