दादर म्हणजे शिवसेनेचा आत्मा आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. याच दादरमध्ये आहे शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन. जुन्या प्रभाग रचनेनुसार शिवसेना भवन असणारा वॉर्ड क्रमांक आहे १९२ तर नव्या रचनेनुसार हा वॉर्ड आता असेल १९८ क्रमांकाचा. सध्या या वॉर्डच्या नगरसेविका आहेत शिवसेनेच्या प्रीती प्रकाश पाटणकर. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांना दहा हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती. २०१२ पर्यंत या वॉर्डवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व होते. पण २०१२ च्या निवडणुकीत मनसेने दादरमधील शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का दिला.
शिवसेना भवन असणाऱ्या वॉर्डमध्ये नगरसेविका म्हणून मनसेच्या स्नेहल जाधव निवडून आल्या होत्या. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने आपला बालेकिल्ला पुन्हा खेचून आणला. प्रीती पाटणकर यांचा हा वॉर्ड लोकसभेच्या दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघात येतो. या मतदारसंघाचे खासदार आहेत राहुल शेवाळे. तर विधानसभा क्षेत्र आहे माहीम आणि आमदार आहेत सदा सरवणकर. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत संपूर्णपणे मनसेच्या ताब्यात गेलेले माहीम विधानसभा क्षेत्रातील सर्व वॉर्ड २०१७ ला पुन्हा शिवसेनेकडे खेचून आणले.
यामध्ये राहुल शेवाळे आणि सदा सरवणकर यांची सर्वात मोठी भूमिका आणि ताकद होती. मात्र यावेळी परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राहुल शेवळे आणि सदा सरवणकर हे दोघेही शिंदे गटात सहभागी झाले आहेत. या भागात शिवसेनेची ताकद असणारी नेते मंडळीच आता शिवसेनेत नसल्यामुळे पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. या भागात मराठी मते मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही मते मिळवण्यासाठी मनसे आणि शिवसेनेत रस्सीखेच असल्याचं गेल्या काही वर्षात बघायला मिळालं आहे. त्यामुळे पूर्वी हा शिवसेनेचा गड जिंकून आणणारे वाघ शिवसेना सोडून गेले असले तरी हा वॉर्ड राखणे शिवसेनसाठी अस्तित्वाचा प्रश्न आहे.