मुंबईमधील उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीयांच्या वस्तीचा समावेश असलेला परिसर म्हणजे मरिन ड्राईव्ह, चिराबाजार, ठाकूरद्वार, सी. पी. टँक, कुंभारवाडा, काळबादेवी, झवेरी बाजार, भुलेश्वर. मुंबई महानगरपालिकेच्या सी विभाग कार्यालयाच्या हद्दीत हा परिसर मोडता. सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा व्यापार करणाऱ्या जवाहिरांचा राबता असलेले झवेरी बाजार, लहान-मोठ्या इमारतींमध्ये विखुरलेल्या सोन्या-चांदीच्या पेढ्या, कापड व्यवसायामुळे घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी गजबजलेला काळबादेवी, फुलबाजार आणि अन्य वस्तूंच्या दुकानांमुळे कायम गर्दीत हरवलेले भुलेश्वर… या व्यापारी केंद्रांमुळे या परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या विभागाला मरिन ड्राईव्ह येथील अथांग समुद्र लाभला असून त्यालगत उभी असलेली उच्चभ्रू वस्ती या परिसराच्या वैभवात भर टाकत आहे. उच्चभ्रू वस्तीच्या तुलनेत दाटीवाटीने उभ्या चाळींची संख्या कैकपटीने मोठी आहे. अरुंद आणि अस्वच्छ घरगल्यांमुळे काही भागात बकाल रूप आले आहे. अधूनमधून होणारा अपुरा आणि दुषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न या विभागाच्या पाचवीला पुजला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील व्यापारी केंद्रांपैकीच एक असलेल्या या भागाचा विकास पाहिजेल तसा झालेला नाही. इतकेच नव्हे तर नागरी सुविधांपासूनही हा परिसर तसा वंचितच. अस्वच्छता, अपुरा-दुषित पाणीपुरवठा, दाटीवाटीने उभ्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास, धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे वास्तव्य अशा एक ना अनेक समस्यांनी परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये लोखंड बाजारानेही याच परिसरात शिरकाव केला आहे. चाळींच्या तळमजल्यावरील सलग चार-पाच खोल्या खरेदी करून त्यात लोखंडाचा व्यापार सुरू करण्यात आला आहे. लोखंड आणि अन्य साहित्याची हातगाड्यांवरून होणारी वाहतूक निवासी भागासाठी मोठी डोकेदुखी बनली आहे.

काही वर्षांपूर्वी काळबादेमधील हनूमान गल्लीतील एका इमारतीला भीषण आग लागली होती. दुघटना घडल्यानंतर अरुंद रस्त्यांवरून घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. आग विझविण्याचे काम सुरू असतानाच दुर्घटनाग्रस्त इमारत कोसळली आणि तिच्या ढिगाऱ्याखाली प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांसह चार अधिकारी अडकले. पेटत्या निखाऱ्यांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अधिकाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मृत्यूशी झुंज देताना त्यांना वीरमरण आले. यानंतर काळबादेवीतील अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, दाटीवाटीने उभ्या इमारती, सोन्या-चांदीचे दागिने घडविणाऱ्या पेढ्यांमुळे निर्माण झालेले प्रश्न अशा अनेक समस्या ऐरणीवर आल्या. याच भागातून मेट्रो 3 जात आहे. त्यामुळे चिराबाजारवासीयांना कायमच वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावत आहे. मात्र या समस्यांवर आजतागायत तोडगा काढण्यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या सी विभाग कार्यालयाच्या हद्दीत तीन प्रभाग मोडतात. एकेकाळी या परिसरात मोठ्या प्रमाणावर मराठी भाषकांचे वास्तव्य होते. मात्र कालौघात निरनिराळ्या कारणांमुळे या परिसरातील मराठी भाषक विरार, डोंबिवलीला स्थायी झाले आणि या परिसरात परप्रांतीयांचा टक्का वाढला. मराठी टक्का अगदीच ओसरला म्हणता येणार नाही, पण निवडणुकीतील विजयासाठी तो पुरेसा नाही हे नक्कीच. भाजप नेत्यांचा या भागात दांडगा जनसंपर्क आहे. परिणामी, मुंबई महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत या तिन्ही प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. या भागावर भाजपचा पगडा असला तरी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अमीन पटेल यांनी बाजी मारली होती. शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र बागलकर यांनी प्रभाग क्रमांक २२० मधून भाजपला टक्कर दिली होती. भाजप उमेदवार अतुल शाह आणि सुरेंद्र बागलकर यांना समसमान मते ते मिळाली. अखेल इश्वर चिठ्ठी काढण्यात आली आणि त्यात अतुल शाह बाजी मारून गेले होते. एकूणच परिस्थिती पाहता या परिसराचा सशक्त असा विकास होऊ शकलेला नाही. मतदारांनी याचा विचार करणे गरजेचे आहे.

मागील निवडणुकीत विजयी झालेले भाजप उमेदवार

प्रभाग क्रमांक २२० – अतुल शाह

प्रभाग क्रमांक २२१ – आकाश पुरोहित

प्रभाग क्रमांक २२२ – रिटा मकवाना

मराठीतील सर्व दक्षिण मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc election 2022 c division suffering from problems of narrow roads old buildings asj