एका छोट्या राज्याएवढा अर्थसंकल्प असलेली महापालिका म्हणून मुंबई महापालिका ओळखली जाते. मुंबई पालिकेचा कामाचा पसारा मोठा असून मुंबईकरांसाठी मुलभूत सुविधा पुरवण्याबरोबर आवश्यक पायाभूत सुविधा प्रकल्पही राबवते. अशा सर्व कामांना ज्या समितीत मान्यता मिळते ती म्हणजे स्थायी समिती. मुंबईतील अनेक मोठे प्रकल्प,कंत्राट इतकंच नाही तर मुंबई महापालिकेचा हजारो कोट्यावधीचा अर्थसंकल्प हा आधी स्थायी समितीत मंजूर केला जातो. त्यामुळेच स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाला महापौर पदापेक्षा जास्त महत्व आहे आणि याच स्थायी समितीवर सलग चार वर्षे अध्यक्ष पद भूषविलेल्या शिवसेनेच्या यशवंत जाधव यांना नवा वॉर्ड शोधण्याची वेळ आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यशवंत जाधव हे १९९७ मध्ये माझगाव येथून नगरसेवक झाल्यावर एक पराभव वगळता ते सातत्याने महापालिकेत निवडून आले आहेत. बाळा नांदगावकर यांनी शिवसेना सोडल्यावर माझगाव भायखळा विभागातील सर्वच सूत्रे यशवंत जाधव यांच्याकडे आली. २०१७ मध्ये पुन्हा महापालिकेत प्रवेश केल्यानंतर यशवंत जाधव याना सभागृह नेते पद देण्यात आले. त्यानंतर २०१९ ला त्यांना स्थायी समिती अध्यक्ष पद देण्यात आले. त्यानंतर सलग चार वेळा यशवंत जाधव यांची स्थायी समिती अध्यक्ष म्हणून वर्णी लागली.आक्रमक भाषा शैली, विरोधकांचा विरोध मोडून काढून प्रस्ताव मंजूर करणे यामुळे यशवंत जाधव मातोश्रीच्या जवळचे झाले होते.२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्या विजयी झाल्या.

एप्रिल महिन्यात यशवंत जाधव यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडी कडून समन्स बजावण्यात आले होते, त्यानंतर त्यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली, त्यांच्या ४० मालमत्ता जप्त करण्यात आल्या. यशवंत जाधव यांनी गैरव्यवहार करत कोट्यावधी पैसे हे दुबईला पाठवले असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या शिंदे गटात सामील झाल्या. त्यामुळे यशवंत जाधवही शिंदे गटात सामील असल्याची चर्चा सुरू आहे. या महापालिका प्रभाग आरक्षणांमध्ये यशवंत जाधव यांचा २१७ हा प्रभाग महिला आरक्षित झाल्यामुळे जाधव यांच्या समोर कोणत्या प्रभागातून उमेदवारी मिळवायची हा प्रश्न उभा राहिला आहे. त्यातच आता ते शिंदे गटात गेले असल्याच्या चर्चेमुळे त्यांना सेनेकडून उमेदवारी मिळेल का आणि कोणत्या प्रभागातून यावर मात्र प्रश्नचिन्हच आहे. निवडणुक लढवण्यासाठी यशवंत जाधव यांना नवीन वॉर्ड शोधावा लागणार आहे.

मराठीतील सर्व दक्षिण मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc election 2022 four consecutive times standing committee chairperson yashwant jadhav has to find new ward due to reservation asj