देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई शहराची ओळख आहे आणि त्यातही मुंबईतील आर्थिक केंद्र कुठे असेल तर ते दक्षिण मुंबईत. रिझर्व बॅक ऑफ इंडिया, शेयर बाजार, सर्व प्रमुख बॅंकाची मुख्यालये तसंच विविध नामांकित कंपन्यांची कार्यालये आणि मुख्यालये ही या भागात आहेत. सोबत पश्चिम आणि मध्य रेल्वेची मुख्यालये, ससुन डॉक, क्रुझ टर्मिनल, पोर्ट ट्रस्ट आणि विविध गोदी हेही याच भागात येतात. एवढंच नाही तर राज्याचे मुख्यालय मंत्रालय, पोलिस मुख्यालये, उच्च न्यायालयही याच भागात आहेत, गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह सारखे पर्यटन स्थळेही याच भागात आहेत. त्यामुळे या भागात सर्व भाषिक लोकांची ये-जा असते.
असं असलं तरी या भागात मुख्यतः मराठी आणि गुजराती या भाषिकांचे प्रमुख्याने वास्तव्य आहे. दररोज हजारो लोकांनी ये-जा या भागात असली तरी या भागाची लोकंख्या मुंबईच्या इतर भागाच्या तुलनेत जरा कमीच आहे. हा सर्व भाग ए वॉर्डमध्ये येत असून इथे फक्त तीनच वॉर्ड येतात, वॉर्ड क्रमांक २२५, २२६ आणि २२७. सध्या या इथे शिवसेनेचा एक आणि भाजपाचे दोन नगरसेवक आहेत. हा सर्व भाग हा कुलाबा विधानसभा मतदारसंघात येत असून गेली काही वर्षे यावर भाजपचाच झेंडा कायम राहिला आहे. एकेकाळी दक्षिण लोकसभा मतदार संघात काँग्रसचे वर्चस्व होते, त्यामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेसचे अस्तित्व होते, मात्र आता बदललेल्या परिस्थितीत काँग्रेसची ताकद दिसत नाही. भाजपाप्रमाणे शिवसनेची पक्ष बांधणी इथे चांगली आहे. सध्या या भागात सेना-भाजपाचे नगसेवक असले तरी बदललेल्या परिस्थितीत सेनेचा प्रभाव किती रहातो याचा अंदाज लावणे सध्या कठिण आहे.