मोदी सरकारमधील यापूर्वीचे अर्थसंकल्प मांडणारे अरुण जेटली यांच्याकडील अर्थखाते यंदाही कायम असले तरी २०१६-१७चा अर्थसंकल्प तयार करणारी यंदाची टीम एकदम ‘फ्रेश’ आहे. अर्थसंकल्पाची २९ फेब्रुवारी २०१६ची तारिख निश्चित होण्यापूर्वी सप्टेंबरमध्ये ती बांधली गेली. अर्थात ती या क्षेत्रातील गाढा अनुभव असलेल्यांच्या माध्यमातून. त्यातील अनेक जण या चमूत असले तरी त्यांच्याकडील विषय यापूर्वी एकमेकांकडे राहिले आहेत. यामध्ये अर्थतज्ज्ञ, प्राध्यापक ते राज्यातील सचिव आदी अनुभव असलेलेही आहेत.
जयंत सिन्हा : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
अर्थ खात्यात विशेषत: सहकारसारखी जबाबदारी सिन्हा यांच्यावर आहे. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात काही वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या जयंत सिन्हा यांचे ते पुत्र. राजकारणापेक्षा व्यावसायिकतेवर ते अधिक बोलतात. दिल्लीच्या आयआयटीचे विद्यार्थी असलेले जयंत सिन्हा यांचा व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईशी संबंध आला आहे.
अरुण जेटली : केंद्रीय अर्थमंत्री
अर्थ आणि कायदा विषयाचे जाणकार जेटली यांचा हा तिसरा अर्थसंकल्प. राज्यसभेत विरोधी पक्षनेते आणि दिल्ली उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून त्यांचे वाक्चातुर्य वाखाणले गेले आहे. भाजपच्या दिल्ली वर्तुळात घडलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यांना पुढे वाणिज्य, संरक्षण आदी खात्यांची संधी देणारे ठरले.
अरविंद सुब्रमण्यन : मुख्य आर्थिक सल्लागार
अर्थसंकल्पासाठीची महत्त्वाच्या व्यक्तींची मोट बांधल्यानंतर हे नाव नव्याने समोर आले. थेट सरकारचेच मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून ते ऑक्टोबरमध्ये रुजू झाले. त्यापूर्वी हे पद जवळपास वर्षभर रिक्त होते. रिझव्र्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्यानंतर अनेक महिन्यानंतर भरण्यात आलेल्या या पदावरील सुब्रमण्यन हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अर्थतज्ज्ञ राहिले आहेत. भारत, चीन तसेच अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवरील त्यांचे लिखाण प्रसिद्ध आहे. एमफिल, डिफिल आदी पदव्या त्यांच्याकडे आहेत.
अरविंद पानगढिया : निती आयोगाचे उपाध्यक्ष
पंतप्रधान अध्यक्ष असलेल्या निती आयोगाचे पानगढिया यांचे हे खालोखालचे पद. अर्थतज्ज्ञ, प्राध्यापक अशी बिरुदे त्यांच्यामागे लागली आहेत. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातही त्यांनी अध्ययन केले आहे, तर एशियन डेव्हलपमेंटसारख्या बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञपद त्यांनी भूषविले आहे.
आर्थिक विषयावरील दहाहून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
रतन वटल : वित्त सचिव (मुख्य)
नवा अर्थसंकल्प तयार करायचा तर नवे नेतृत्वही तसे हवे. राजीव मेहेरिषी हे गृह खात्यात गेल्यानंतर वित्त विभागाची मुख्य जबाबदारी वटल यांच्यावर आली. अन्य विभागीय सचिव ही त्यांचीच ‘टीम’. वटल हे याच विभागांतर्गत महसूलचे काम पाहत होते. अर्थ विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी ते आहेत. आंध्र प्रदेश कॅडरमधील वटल यांनी तामिळनाडूमध्येही काम केले आहे.
शक्तिकांता दास : सचिव (आर्थिक व्यवहार)
अर्थसंकल्पाच्या पूर्ण प्रक्रियेची जबाबदारी यांची. अर्थ खात्यातीलच वित्तीय सेवा आणि महसूल हे विभागही त्यांनी यापूर्वी हाताळले आहेत. अर्थसंकल्पात सर्वात महत्त्वाच्या कर विषयक विषयांची हाताळणी त्यांच्यामार्फत होते. हा किचकट विषय माहिती तंत्रज्ञानाच्या साथीने सुलभ करण्याचा प्रयत्न ते विभागाचे सचिव या नात्याने करत आहेत. वित्तीय तुटीचे आव्हान यंदा कसे पेलले जाते याची चुणूक दास यांच्या जबाबदारीने दिसेल.
हसमुख अधिया : सचिव (महसूल)
पंतप्रधान मोदींच्या गुजरातमधून आलेले अधिया अर्थ खात्यातील महत्त्वाच्या महसूल विभागापूर्वी त्यांनी वित्तीय सेवा या अन्य महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी हाताळली आहे. पंतप्रधानांचा आवडीचा विषय असलेल्या योगामध्ये अधिया यांनी पीएचडी केली आहे. सार्वजनिक व्यवस्थापन आणि धोरण या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमातील ते ‘गोल्ड मेडलिस्ट’ आहेत.
नीरज कुमार गुप्ता : सचिव (र्निगुतवणूक)
सरकारचे निर्गुतवणुकीचे अपेक्षित लक्ष्य यंदाच्या आर्थिक वर्षांत पूर्ण होणार नसले, तरी आतापर्यंत या माध्यमातून उभे राहिलेल्या १३ हजार कोटी रुपयांचे श्रेय गुप्ता यांच्याकडे जाते. भांडवली बाजारातील वातावरण पूरक नसल्याचे ओळखून त्यांनी ही निर्गुतवणूक आस्तेकदम नेण्याची सूचना आपल्या अधिकारात अर्थ मंत्रालयाला केली. उत्तर प्रदेश कॅडरचे गुप्ता हे यापूर्वी जवळपास याच क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक उपक्रम विभागाचा कार्यभार पाहत होते.
अंजली चिब-दुग्गल : सचिव (वित्तीय सेवा)
अर्थसंकल्पाची तयारी सुरू होण्याच्या तोंडावर अर्थ खात्यातील अन्य एक महत्त्वाच्या विभागात अंजली चिब-दुग्गल यांची नियुक्ती करण्यात आली. पंजाब कॅडरच्या दुग्गल या विभागाचा कार्यभार हाताळणाऱ्या हसमुख अधिया यांच्या जागी आल्या. यापूर्वी त्या कंपनी व्यवहार तसेच अर्थ खात्यातही (खर्च विभाग) कार्यरत होत्या. जेटली यांच्याकडे असलेल्या माहिती व प्रसारण विभागातही दुग्गल यांनी २००२ मध्ये काम केले आहे.
संकलन : वीरेंद्र तळेगावकर